ऋषिपंचमीला कपिलेश्वर तीर्थक्षेत्री खान्देशातून १२ हजार महिला भाविकांचे शाही स्नान

अमळनेर (प्रतिनिधी) ऋषिपंचमीनिमित्त अमळनेर तालुक्यातील पाडळसरेजवळ तापी व पांझरा नदीच्या संगमस्थळी मंगळवारी खान्देशातील सुमारे १२ हजार महिला भाविकांनी शाही स्नान केले.

जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यासह खान्देशातील विविध भागांतून पहाटे ५ वाजेपासून सायंकाळपर्यंत महिला भाविकांची संगमस्थळी मोठी गर्दी झाली होती. तापी नदीत स्नान व जलपूजन केल्यानंतर भाविकांनी पुरातन श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिरातील त्रिपीडी कपिलेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. ऋषिपंचमीनिमित्त संगमस्थळी शाही स्नान, ऋषीपूजन, तापी आरती आणि कथाप्रवचन अशा धार्मिक कार्यक्रमांची दिवसभर रेलचेल होती. आचार्य महामंडलेश्वर स्वामी हंसानंदतीर्थ महाराज यांनी दुपारी १ ते २.३० वाजेदरम्यान ऋषिपंचमी माहात्म्यावर प्रवचन करून भाविकांना मार्गदर्शन केले. ऋषिपंचमीला पवित्र संगमस्थळी स्नान केल्याने दुःख, पीडा दूर होऊन संकटांचा नाश होतो, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने खान्देशाच्या कानाकोपऱ्यातून महिला भाविक मोठ्या संख्येने दाखल झाल्या होत्या. जळगाव, भुसावळ, पारोळा, पाचोरा, चोपडा, शिरपूर, शिंदखेडा, धुळे, नंदुरबार यांसह अनेक ठिकाणांहून महिला भाविक आल्याने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मंदिर परिसरात नीम, मुडावद व अमळनेर येथील व्यावसायिकांनी पूजेच्या साहित्याची दुकाने थाटली होती. श्रीक्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट, मुडावद-नीम (तापी-पांझरा संगम) व समस्त भक्त परिवाराच्या वतीने बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी निवासाची तसेच प्रवचन ऐकण्यासाठी मंडप, बसण्याची व विसाव्याची व्यवस्था करण्यात आली होती. नदीपात्रात पुरामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर संस्थानकडून महिला स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. कपिलेश्वर मंदिर संस्थानचे सचिव मघन पाटील, विश्वस्त तुकाराम पाटील, उपाध्यक्ष सी. एस. पाटील, डॉक्टर एल. डी. चौधरी, सुभाष पाटील व लादू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला स्वयंसेवकांकडून नदीपात्रातील डोहात न उतरता काठावरच स्नान करण्याच्या सूचना ध्वनिक्षेपकावरून वारंवार देण्यात आल्या. भाविकांना आवश्यक त्या ठिकाणी मदतनीसांचे सहकार्यही मिळाले. मारवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी, महिला पोलीस कर्मचारी तसेच पोलिसांनी भाविक व वाहनचालकांना सुरक्षिततेसाठी सहकार्य केले. श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिर हे खान्देशातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असल्याने ऋषिपंचमीच्या निमित्ताने येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झाली होती. मंदिरापर्यंत जाणारी अमळनेर आगाराची बससेवा श्रावण महिन्यापासून सुरू असल्याने अनेक महिला भाविकांना थेट कपिलेश्वर मंदिरापर्यंत पोहोचण्याची सुविधा मिळाली. तसेच खासगी वाहनचालकांनी अमळनेर तसेच कळमसरे-नीम येथून प्रवासी महिलांना मंदिरापर्यंत सोडण्यासाठी सहकार्य केले. खासगी वाहनांची संख्या मोठी असल्याने नीम ते श्रीक्षेत्र कपिलेश्वरदरम्यान सुमारे दोन किलोमीटरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *