
शनिवारऐवजी मंगळवारी झाडे छाटणी; पाच-सात दिवस रस्त्यांवर फांद्यांचा खच, पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर भार
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील विद्युत वाहिन्या व खांबांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी महावितरणकडून ठेकेदारामार्फत करण्यात आली. महावितरणकडून देखभाल-दुरुस्तीची कामे साधारणपणे शनिवारी केली जात असल्याची नागरिकांना कल्पना असते. त्यामुळे या दिवशी वाहतूक व नागरिकांची गैरसोय तुलनेने कमी होते. मात्र, यावेळी शनिवारऐवजी मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यातच छाटणीपूर्वी नगरपरिषदेला कोणतीही पूर्वसूचना न देणे आणि छाटलेल्या फांद्या व पालापाचोळा रस्त्याच्या कडेला टाकून देण्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या पाच-सात दिवसांपासून शहरातील विविध भागांत फांद्यांचा खच पडून असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासोबतच अस्वच्छतेचे चित्र निर्माण झाले आहे. महावितरणने ठेकेदार नेमलेला असतानाही कचरा उचलण्याची जबाबदारी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांवर पडल्याने पालिकेच्या आरोग्य विभागावर अतिरिक्त ताण आला आहे. वीज वाहिन्यांच्या सुरक्षिततेसाठी झाडांची छाटणी आवश्यक असली तरी छाटणीनंतर निर्माण होणाऱ्या फांद्या, पालापाचोळा व जैविक कचऱ्याची उचल व वाहतूक संबंधित ठेकेदारानेच करणे अपेक्षित आहे. मात्र, रस्त्यांच्या कडेला व नाल्यांलगत कचरा पडून असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून हा कचरा नाल्यांत गेल्यास पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. या प्रकाराची दखल घेत नगरपरिषदेने महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र देऊन नाराजी व्यक्त केली असून, यापुढे झाडांची छाटणी अथवा झाडतोड करण्यापूर्वी नगरपरिषदेला लेखी पूर्वसूचना देणे, कामाचे ठिकाण व स्वरूप कळविणे तसेच छाटणीतून निर्माण झालेला कचरा संबंधित पथक अथवा ठेकेदाराने तात्काळ उचलणे, अशा सूचना केल्या आहेत. मात्र, ठेकेदाराने कचरा उचलला नाही तर त्याच्यावर कारवाई का झाली नाही, कामाची पाहणी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केली का आणि नगरपरिषदेला पूर्वसूचना न देता शनिवारऐवजी मंगळवारी काम करण्याचा निर्णय कोणी घेतला, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. केवळ नगरपरिषदेकडून पत्र देऊन हा विषय संपणार नसून, ठेकेदारावर कारवाई, रस्त्यावर पडलेला कचरा उचलण्याचा खर्च आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर पडलेल्या अतिरिक्त कामाची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. त्यामुळे महावितरणचे वरिष्ठ अधिकारी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित ठेकेदारासह जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करतात की प्रकरण कागदोपत्रीच राहते, याकडे अमळनेरकरांचे लक्ष लागले आहे.
छाटणीनंतरचा कचरा संबंधित ठेकेदारानेच उचलणे अपेक्षित
वीज वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी ही सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असते. छाटणीनंतर निर्माण झालेल्या फांद्या व पालापाचोळा संबंधित ठेकेदारामार्फत उचलण्याच्या सूचना देण्यात येतात. या प्रकरणात रस्त्याच्या कडेला कचरा राहिला असल्यास त्याची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला तो तात्काळ उचलण्याच्या सूचना करण्यात येतील. तसेच कामकाजाबाबत आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.
– हेमंत सैंदाणे, सहाय्यक अभियंता, शहर कक्ष क्र. १, महावितरण, अमळनेर
पूर्वसूचना मिळाल्यास कचरा व्यवस्थापनाचे नियोजन करू
महावितरणकडून झाडांची छाटणी करण्यापूर्वी नगरपरिषदेला पूर्वसूचना मिळणे आवश्यक आहे, जेणेकरून निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या उचल व व्यवस्थापनाबाबत नियोजन करता येईल. छाटणीनंतर फांद्या व पालापाचोळा रस्त्यालगत पडून राहिल्यास नागरिकांना तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याबाबत नगरपरिषदेकडून महावितरणला पत्र देऊन संबंधित ठेकेदाराने कचरा उचलण्याबाबत स्पष्ट सूचना करण्याची मागणी करण्यात आली आहे. किरण कंडारे, आरोग्य निरीक्षक, नगरपरिषद अमळनेर

Leave a Reply