
पैशाच्या जोरावर नोकरी मिळवण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची कास धरावी
प्रा. सुनील गरुड यांचे प्रतिपादन
अमळनेर (प्रतिनिधी) केवळ पैशाच्या जोरावर नोकरी मिळवण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची कास धरून आपले जीवन सुखकर करावे. कारण “येणारा काळ हा स्पर्धात्मक युगाचा आहे. इथून पुढची सर्व नोकरी भरती ही स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातूनच होणार असल्याने विद्यार्थ्यांनी जगात घडणाऱ्या घडामोडींचे ज्ञान अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नवलभाऊ प्रतिष्ठानचे मानद शिक्षण संचालक प्रा. सुनील गरुड यांनी केले.
स्थानिक नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात “शिक्षण महर्षी नानासाहेब विजय पाटील ग्रंथालय ” विभागाच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधान आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रशासक डी. बी. पाटील होते. प्रा. सुनील गरुड पुढे म्हणाले की, पुणे येथील युनिक अकादमीने स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत दर्जेदार ३० पुस्तकांचा संच नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील “शिक्षण महर्षी नानासाहेब विजय पाटील ग्रंथालयास भेट दिला आहे. विद्यार्थ्यांनी या पुस्तकांचा पुरेपूर लाभ घ्यावा. तसेच, प्रत्येक महाविद्यालयात ‘करिअर कट्टा’ सुरू होणे आवश्यक असून, तिथे विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणावरच चर्चा करावी. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. चौधरी यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले की, “पुस्तकांचा खजिनाच आपले भवितव्य घडवत असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुस्तकांना आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व दिले पाहिजे. विद्यार्थिनी माधुरी पाटील हिने सादर केलेल्या देशभक्तीपर गीताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मंचावर प्रा. उषा पाटील, डॉ. नरेंद्र पाचपांडे, डॉ. नयना वाणी, डॉ. जितेश चव्हाण, डॉ. सुनंदा तायडे, प्रा. कैलास देवरे, ग्रंथपाल डॉ. विजय गाढे, विनिता पाटील तसेच अनिकेत पाटील, किरण रावलं, विनोद पाटील, राजू पाटील, चेतन थोरात आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय उमेश काटे यांनी केले. सूत्रसंचालन माधुरी पाटील हिने तर आभारनूतन पाटील हिने मानले.
यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव
या शिबिराचे औचित्य साधून टीईटी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या प्राची दीपक पाटील, जयश्री रोहिदास पाटील, वेदांत राजेंद्र चौधरी आणि हरीश जगदीश पाटील या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

Leave a Reply