
एकाच वर्षी भावंडांची डॉक्टरकीची किमया; डॉ. अक्षय पाटील एम.डी., तर डॉ. अक्षता पाटील एम.बी.बी.एस. उत्तीर्ण
अमळनेर (प्रतिनिधी) जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर अमळनेर येथील बांधकाम व्यावसायिक तथा अभियंता हेमंत जिजाबराव पाटील यांच्या दोन्ही मुलांनी एकाच वर्षी वैद्यकीय क्षेत्रातील पदव्या संपादन करून कुटुंबासह अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मोठा मुलगा डॉ. अक्षय हेमंत पाटील यांनी एम.डी. मेडिसिन (आयुर्वेद) ही पदवी उत्कृष्ट गुणांनी प्राप्त केली, तर मुलगी डॉ. अक्षता हेमंत पाटील हिने एम.बी.बी.एस. पदवी संपादन करून उल्लेखनीय यश मिळविले आहे.
डॉ. अक्षय हेमंत पाटील यांनी भारती विद्यापीठ, पुणे येथून एम.डी. मेडिसिन (आयुर्वेद) ही पदवी उत्कृष्ट गुणवत्तेसह पूर्ण केली. तर त्यांची बहीण डॉ. अक्षता हेमंत पाटील हिने हैदराबाद येथून एम.बी.बी.एस. पदवी यशस्वीरीत्या संपादन केली. एकाच वर्षात भाऊ आणि बहिणीने डॉक्टरकीची पदवी मिळविल्याने पाटील कुटुंबासाठी हा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला आहे. त्यांच्या यशामागे कठोर परिश्रम, शिस्तबद्ध अभ्यास आणि पालकांचे प्रोत्साहन असल्याची भावना व्यक्त होत आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल डॉ. अक्षय हेमंत पाटील आणि डॉ. अक्षता हेमंत पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांचे वडील हेमंत जिजाबराव पाटील तसेच कुटुंबीयांचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक करण्यात येत आहे. दोन्ही भावंडांनी वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवून समाजसेवेचे कार्य करावे, अशा शुभेच्छाही त्यांना दिल्या जात आहेत.

Leave a Reply