दाजीबा नगर येथे आढळलेल्या अनोळखी तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील दाजीबा नगर परिसरातील कच्च्या रस्त्यालगत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली असून, मृताची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यामुळे या तरुणाची ओळख पटविण्यासाठी अमळनेर पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जून रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास दाजीबा नगर येथील कच्च्या रस्त्याच्या बाजूला अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील एक तरुण मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. मृत तरुणाच्या हातात स्टीलचे कडे व लाल रंगाचा दोरा असून, अंगात निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि राखाडी रंगाची पॅन्ट असा पेहराव आहे. मात्र, त्याच्याजवळ कोणतेही ओळखपत्र अथवा ओळख पटेल अशी कागदपत्रे आढळून आली नसल्याने मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत. या तरुणाबाबत कोणाला काही माहिती असल्यास अथवा त्याची ओळख पटत असल्यास तातडीने अमळनेर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *