
अमळनेरच्या माहेरवाशिणींचा गजरा, मेंहदी अन् बांगड्यांच्या साजात रंगला ‘माहेरचा पारिजात’
अमळनेर (प्रतिनिधी) : माहेरच्या अंगणातील बालपणीच्या आठवणींना उजाळा देत सासर-माहेर दोन्ही कुटुंबांना आपल्या कर्तृत्वाने आणि मायेने समृद्ध करणाऱ्या अमळनेरच्या लेकींचा स्नेहमेळा ‘माहेरचा पारिजात’ या उपक्रमाला शनिवारी, २९ ऑगस्ट रोजी श्री मंगळग्रह मंदिरात मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे आयोजित हा तीन दिवसीय स्नेहमेळा ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत रंगणार असून, मंगळग्रह सेवा संस्थेचे या उपक्रमाला विशेष सहकार्य लाभले आहे.
माहेरच्या अंगणात पुन्हा बालपण अनुभवता यावे, जुन्या आठवणींना उजाळा मिळावा आणि मैत्रिणींसोबत मनमोकळ्या गप्पांची मैफल रंगावी, या उद्देशाने ‘माहेरचा पारिजात’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९ वाजता माहेरवाशिणींचे हळद-कुंकवाने औक्षण करून ढोल-ताशांच्या गजरात उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना मोत्यांचे दागिने आणि गजरे भेट देण्यात आले. त्यानंतर श्री मंगळग्रह देवांची सामूहिक महाआरती करण्यात आली. सकाळी साडेनऊ वाजता माहेरवाशिणींनी एकत्रित येत आपला स्वयंपरिचय करून दिला.
यानंतर कु. आकांक्षाताई, मयुरीताई आणि दीप्तीताई यांनी माहेरवाशिणींच्या हातावर आकर्षक मेंदी रेखाटली. पूजाताई मोराणकर यांनी बांगड्यांसह सौभाग्याचे वाण देत माहेरवाशिणींचा आनंद द्विगुणित केला.
दुपारी सव्वाबारा वाजता सर्व माहेरवाशिणींनी श्री मंगळग्रह देवांचा सामूहिक महाअभिषेक केला. त्यानंतर खानदेशची खासियत असलेल्या पुरणपोळीच्या भोजनाचा आस्वाद घेतला. दुपारी दोन ते तीन या वेळेत सागर गोटे, काचा-कवड्या, चौपट, आट्यापाट्या, तळ्यात-मळ्यात आणि उभा खो-खो आदी पारंपरिक खेळ रंगले. झोक्यांवर बसून गाणी म्हणत माहेरवाशिणींनी माहेरच्या आठवणींमध्ये रमून मनमुराद आनंद लुटला.
सायंकाळी साडेपाच वाजता सामूहिक चहापानानंतर श्री मंगळग्रह देवांची सामूहिक सायंआरती करण्यात आली. त्यानंतर खासदार स्मिताताई वाघ, शहर विकास आघाडीच्या गटनेत्या जयश्रीताई पाटील आणि मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत अमळनेरच्याच माहेरवाशिणी तथा सहाय्यक कर निरीक्षक हर्षाताई साळुंखे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यानंतर सामूहिक मंगळागौरचे खेळ रंगले. रात्री सामूहिक भोजनानंतर पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी अमळनेर महिला मंच ट्रस्टच्या अध्यक्षा कांचनताई शहा, उपाध्यक्षा सौ. तिलोत्तमाताई पाटील, सरोजताई भांडारकर, सचिव वसुंधराताई लांडगे आणि कोशाध्यक्षा प्रा. शीलाताई पाटील यांच्यासह कार्यकारी मंडळातील सदस्या उपस्थित होत्या.
नऊवारी साडी आणि नथीच्या साजात रंगली मंगळागौर
परंपरेचा जागर आणि उत्साहाचा जल्लोष अशा वातावरणात सायंकाळी माहेरवाशिणींनी मंगळागौर उत्साहात साजरी केली. मंगळागौरीची आकर्षक आरास करण्यात आली होती. माहेरवाशिणींनी अस्सल मराठमोळी नऊवारी साडी, नथ आणि पारंपरिक दागिन्यांचा साज करत संस्कृतीची जपणूक केली. यावेळी फुगडी, झिम्मा, गिरकी यांसह विविध पारंपरिक खेळ रंगले. हास्य-विनोद आणि उत्साहाने भारलेल्या या सोहळ्यामुळे स्नेहमेळ्याला विशेष रंगत आली.
आजचे विविध कार्यक्रम
स्नेहमेळ्यात रविवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता चहापान, सकाळी ८.३० वाजता नाश्ता होणार आहे. सकाळी ९.१५ वाजता नीम येथील कपिलेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी माहेरवाशिणी रवाना होणार असून, तेथेच भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता श्री मंगळग्रह मंदिरात वामकुक्षी व विविध खेळ होतील.
सायंकाळी ५ वाजता चहापानानंतर प.पू. संतश्री सखाराम महाराज रोपवाटिकेत भुलाबाई व गौराई उत्सवांतर्गत भोंफळडल्याची गाणी, झोके व खेळ आयोजित करण्यात आले आहेत. सायंकाळी ६ वाजता श्री मंगळग्रह देवांची सामूहिक आरती होईल. रात्री ९.३० वाजता भोजनानंतर शेकोटी कार्यक्रमांतर्गत विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार असून, रात्री १०.३० वाजता विविध खेळांनंतर दिवसाची सांगता होईल.

Leave a Reply