
शिवीगाळच्या कारणावरून बहादरवाडीत पतीस मारहाण तर पत्नीस धक्काबुक्की; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील बहदरवाडी येथे शिवीगाळ का केली, या कारणावरून दारूच्या नशेत पतीला लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण करून पत्नीला धक्काबुक्की केल्याची घटना २१ रोजी रात्री साडे आठ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बहदरवाडी येथील नरेश देवानंद पाटील हे आपल्या पत्नीसोबत घरी जेवत असताना दारूच्या नशेत रमेश प्रभाकर पाटील हा हातात लोखंडी रॉड घेऊन आला. त्याच्यासोबत त्याचे वडील प्रभाकर नामदेव पाटील व मुलगा हेमंत रमेश पाटील हे लाकडी दांडका घेऊन घराच्या ओट्यावर चढून आले. फाट्यावर मला शिवीगाळ का केली असे म्हणत रमेशने नरेश याला शिवीगाळ करत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी प्रभाकर व हेमंत यांनी नरेश याला धरून ठेवले आणि रमेशने लोखंडी रॉडने त्याच्या खांद्यावर मारहाण केली. दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या नरेश यांच्या पत्नीला तिघांनी धक्काबुक्की केली, यात तिचा ब्लाउज फाटला. तसेच पत्नीची बहीण भांडण सोडवण्यासाठी आली असता तिलाही शिवीगाळ करून तिघांनी तुम्हाला सोडणार नाही अशी दमबाजी केली. याप्रकरणी नरेश यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२९(४), ११५(२), ३५१(२), ३५२, ३५५, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.

Leave a Reply