
अमळनेर पालिकेत ‘एक्स्पायरी’चा खेळ, दोन महिन्यांतही आरोग्य प्रश्नांकडे दुर्लक्ष
नगराध्यक्ष स्वतः वैद्यकीय क्षेत्रातील असूनही आरोग्य विषयाचे गांभीर्य नाही !
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर बाबींमध्ये अपेक्षित ती दक्षता घेतली जात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालिकेत सत्तांतर होऊन नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारून दोन महिने उलटले असतानाही कीटकनाशक फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या बीएचसी पावडर व इतर केमिकल्स संदर्भात निष्काळजीपणा होत असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्ष स्वतः वैद्यकीय क्षेत्रातील असूनही आरोग्य विषयाकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात आहे का, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होऊ लागला आहे.
पालिकेकडून फवारणीसाठी वापरले जाणारे काही केमिकल्स २०२३ मध्ये पॅक झालेले असून त्यांची मुदत २०२४ मध्ये संपलेली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनीही एक्स्पायरी झालेला माल वेळेत नष्ट करण्यात आलेला नाही, अशी कबुली दिल्याने प्रशासनातील देखरेखीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीएचसी पावडरच्या काही थैल्यांवर उत्पादन दिनांक असला तरी स्पष्ट एक्स्पायरी डेट नमूद नसल्याचेही निदर्शनास आले. तरीही हेच केमिकल्स शहरात फवारले जात असल्याने नागरिकांसह फवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची टीका होत आहे.
चूक केवळ कर्मचाऱ्याची की देखरेखीची?
एक अशिक्षित कर्मचाऱ्याकडून एक्स्पायरी टीसीएल पावडर वापरली गेल्याची बाब समोर आली असली, तरी ही केवळ त्या कर्मचाऱ्याची चूक मानावी का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रशासकीय पातळीवर नियमित ‘क्रॉस चेक’ होणे अपेक्षित असताना तो झाला का? पदभार स्वीकारल्यानंतर संबंधित विभागांची पाहणी व शहानिशा करणे ही नगराध्यक्षांची जबाबदारी नाही का? अशी चर्चा रंगू लागली आहे.
विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून केवळ कर्मचाऱ्यांवर कारवाई करून विषय आटोपता घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नगराध्यक्ष निर्णय प्रक्रियेत स्वतंत्र भूमिका घेत आहेत का, की कारभार ‘रिमोट कंट्रोल’ने चालतो आहे, अशीही कुजबूज ऐकू येते.
असा झाला प्रकार उघड
सोमवार, दि. २ मार्च रोजी सकाळी ७ वाजता नगरसेवक डॉ. डिगंबर महाले व भरत ललवाणी स्वच्छता मोहिमेसाठी सिंधी कॉलोनीत गेले असता, बीएचसी पावडरच्या थैलीवर उत्पादन व एक्स्पायरी तारखा नमूद नसल्याचे दिसले. तसेच काही केमिकल कॅनवर उत्पादन वर्ष २०२३ व एक्स्पायरी वर्ष २०२४ असल्याचे आढळले. त्यांनी मुख्याधिकारी गणेश शिंदे व आरोग्य निरीक्षक कंडारे यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित अधिकारी रजेवर असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या गोडावूनमध्ये पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात एक्स्पायरी डेटेट माल तसेच निकृष्ट दर्जाचे झाडू व डस्टबिन आढळल्याचे सांगण्यात आले.
साहित्य आहे, पण वापरायोग्य आहे का?
सफाई कर्मचाऱ्यांकडून झाडू व डस्टबिन उपलब्ध नसल्याची तक्रार होत असताना, प्रत्यक्षात गोडावूनमध्ये मोठ्या प्रमाणावर साठा असल्याची चर्चा आहे. मात्र, हे झाडू अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून दोन दिवसही टिकत नसल्याची कर्मचाऱ्यांची नाराजी आहे. आवश्यकतेपेक्षा जादा माल मागविण्यात आला का? की आलेला माल वेळेत वापरला गेला नाही? एक्स्पायरी झालेल्या साहित्याची विल्हेवाट लावण्याची ठरलेली पद्धत का राबविण्यात आली नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
जबाबदारी निश्चित होणार का?
आरोग्य निरीक्षक संतोष जाधव यांनी गोडावूनमध्ये जुने व एक्स्पायरी झालेले साहित्य पडून असल्याची कबुली देत नवीन केमिकल्सची मागणी केल्याचे सांगितले. उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी प्रत्यक्ष पाहणी करून योग्य कारवाईचे आश्वासन दिले. नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनीही पूर्वीच्या कालावधीतील साहित्य पुरवठ्याची माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, नगरसेवक डॉ. डिगंबर महाले व भरत ललवाणी यांनी या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढत असताना, लोकांच्या कररुपी पैशातून होणारी फवारणीच जर निष्प्रभ ठरत असेल, तर ही बाब अधिक गंभीर ठरते.
पालिकेच्या सत्तांतरानंतर दोन महिने उलटले असताना आरोग्यासारख्या संवेदनशील विषयात अशी बेफिकिरी का? हा प्रकार केवळ निष्काळजीपणा आहे की व्यवस्थेतील खोलवरचा घोळ? नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे आता प्रशासनाला द्यावी लागणार आहेत.
नवीन फवारणी केमिकल व औषधांची मागणी
गोदामामध्ये जुने साहित्य असून त्याची गुणवत्ता योग्य नाही. ते कर्मचाऱ्यांना देणे उचित नाही. विभागप्रमुख म्हणून मला एक महिना झाला आहे. तेथे एक्सपायर झालेले साहित्य पडून आहे. साधारणतः 2024- 25 मध्ये ते एक्सपायर झालेले आहे. नवीन फवारणी केमिकल व औषधांसाठी मागणी करण्यात आलेली आहे.
– संतोष जाधव, आरोग्य निरीक्षक
योग्य ती कारवाई कारणार
एक्स्पायरी संपलेल्या औषधींबाबत माहिती मिळाली आहे. याबाबत प्रत्यक्ष गोडाऊनवर जाऊन पाहणी करणार आहे. गोडाऊन मध्ये पडलेला माल किती ? त्याची एक्सपायरी डेट काय आहे ? याची शहानिशा करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.
–प्रशांत निकम, उपनगराध्यक्ष.
चौकशी करून योग्य कारवाई करू
पूर्वी प्रशासकीय कालावधीत आतापर्यंत जो काही साहित्य पुरवठा करण्यात आला आहे याची माहिती घेण्यात येईल. संबंधित कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदार असतील, त्यांचीही चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.
– डॉ. परीक्षित बाविस्कर, नगराध्यक्ष.
संबंधितांना वठणीवर आणले पाहिजे
शहरात अनेक ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. साथीचे रोग फैलावून जनसामान्य त्रस्त होऊ नयेत, यासाठी लोकांच्या कष्टाच्या व घामाच्या कररुपी पैशातून पालिका विविध प्रकारच्या फवारण्या करीत असते. त्यासाठी लागणारे केमिकल्स जर निकृष्ट दर्जाचे आणि मेलेले वापरत असतील तर असे करणारे म्हणजेच लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांचाही जीव टांगणीला लागेल अशी कारवाई झाली पाहिजे. आमदार अनिलदादा पाटील यांनी सदर गंभीर प्रकाराबाबत विधिमंडळात आवाज उठवायला हवा, तर पालिकेचे मार्गदर्शक माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनीही संबंधितांना वठणीवर आणले पाहिजे. मी याबाबत सर्वत्र लेखी तक्रारीही करीतच आहे.
– डॉ. डिगंबर महाले, नगरसेवक
एक्स्पायरी डेटेट केमिकल्स पाहून धक्काच बसला
माझ्या वॉर्डात दीर्घकाळापासून अनेक समस्या आहेत. त्यातही स्वच्छतेच्या तर खूपच गंभीर समस्या आहेत. संबंधितांनी वॉर्डाच्या साफसफाईकडे कमालीचे दूर्लक्ष केले आहे. माझ्या वॉर्डात मोठ्या प्रमाणावर दलित, आदिवासी तसेच अल्पसंख्याक नागरिक मोठ्या प्रमाणावर आहेत. आज माझ्या वॉर्डातील स्वच्छता मोहीम राबविताना एक्स्पायरी डेटेट केमिकल्स पाहून फक्त धक्काच बसला नाही, तर संबंधित यंत्रणा किती बेरहम व माणुसकी कोळून प्यालेली आहे याची जाणीव झाली. संबंधितांना कठोर शिक्षा होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाहीत.
– भरत ललवाणी, नगरसेवक

Leave a Reply