
अमळनेरचा भूमिपुत्र सीए राधेश्याम अग्रवाल यांची शिक्षण प्रसारक मंडळी पुणेच्या उपाध्यक्षपदी निवड
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील श्री बजरंगलाल बन्सीलाल अग्रवाल यांचे सुपुत्र सीए राधेश्याम बजरंगलाल अग्रवाल यांची पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळी या ख्यातनाम शैक्षणिक संस्थेच्या नियमक मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे अमळनेर शहराच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातून स्वागत केले जात आहे.
शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे ही राज्यातील एक प्रतिष्ठित व दीर्घ परंपरा असलेली संस्था असून तिच्या अंतर्गत अनेक नामांकित महाविद्यालये आणि शिक्षण शाखा कार्यरत आहेत. संस्थेच्या छत्राखालील प्रमुख संस्थांमध्ये एस. पी. कॉलेज, पुणे, रामनारायण रुईया महाविद्यालय, मुंबई, रा. मा. पोद्दार महाविद्यालय, मुंबई) तसेच वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई) यासारख्या नामांकित संस्थांचा समावेश आहे. याशिवाय संस्थेच्या इतर १६ शिक्षण शाखा विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत.
सीए राधेश्याम अग्रवाल हे व्यावसायिक क्षेत्रात चार्टर्ड अकाउंटंट म्हणून उल्लेखनीय कार्य करत असून शैक्षणिक व सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यांच्या कार्यकुशलतेची दखल घेत संस्थेच्या नियमक मंडळावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. अमळनेरचा भूमिपुत्र पुण्यातील अशा ख्यातनाम संस्थेच्या नेतृत्व पातळीवर विराजमान होणे ही सर्व अमळनेरकरांसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून स्वागत होत असून शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
सीए राधेश्याम अग्रवाल यांच्या पुढील कार्यकाळात संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीस नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply