एनसीएमसी कार्डसाठी जादा शुल्क घेणाऱ्या आणखी दोन एजंटवर कारवाई; मशीन जप्त

अमळनेर (प्रतिनिधी) एसटी प्रवास सवलतीसाठी आवश्यक असलेल्या एनसीएमसी कार्ड देताना सामान्य नागरिकांकडून जादा शुल्क आकारून लुटणाऱ्या आणखी दोन एजंटवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्या मशीन जप्त करण्यात आल्या आहेत.

याबबात अधिक माहिती अशी की, १२ वर्षांवरील महिला, जेष्ठ नागरिक आणि अमृत जेष्ठ नागरिकांसाठी एसटीने एनसीएमसी कार्ड बंधनकारक केले आहे. यासाठी प्रत्येक आगारात तसेच खाजगी एजंट नेमण्यात आले आहेत. प्रत्येक कार्डसाठी शासनाने १९९ रुपये फी निश्चित केली असताना काही एजंट नागरिकांकडून सुमारे ३०० रुपये फी घेऊन लुबाडणूक करत असल्याच्या तक्रारी विभाग नियंत्रक दिलीप बंजारा यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार त्यांनी वाहतूक निरीक्षक देशमुख आणि चोपडा आगार प्रमुख पाटील यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. अमळनेर बसस्थानकावर माया शिवदे यांना एजन्सी देण्यात आली होती. मात्र त्यांनी ठराविक ग्राहक करून जळोद येथे जादा दराने कार्ड देत नागरिकांची लुबाडणूक केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्या ताब्यातील मशीन जप्त करून कारवाई करण्यात आली. तसेच चोपडा बसस्थानकावर कुणाल गायकवाड या एजंटकडूनही ग्राहकांकडून जादा शुल्क घेतल्याचे आढळून आल्याने त्यांचे मशीन जप्त करून कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी एनसीएमसी कार्ड काढताना शासनाने निश्चित केलेली १९९ रुपये फीच द्यावी आणि जादा पैसे मागितल्यास संबंधित आगार प्रमुखांकडे तक्रार करावी, असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *