शताब्दीच्या उंबरठ्यावर शेतकरी सहकारी संघात प्रतिष्ठेची तिरंगी रणधुमाळी सुरू

आर्थिक स्थिती नाजूक; पुनरुज्जीवनाकडे दुर्लक्ष, निवडणुकीसाठी १० लाखांचा भुर्दंड; “लक्ष्मी दर्शन”च्या चर्चांनी तालुका तापला

अमळनेर (प्रतिनिधी) सन १९२७ मध्ये स्थापन झालेला आणि पुढील वर्षी शताब्दी वर्षात पदार्पण करणारा अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत असतानाही त्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत मात्र प्रतिष्ठेची तिरंगी लढत रंगली आहे. निवडणूक बिनविरोध करण्याची संधी हुकल्याने संघाला निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक प्राधिकरण, पुणे येथे तब्बल १० लाख रुपये जमा करावे लागल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. त्यामुळे सहकारापेक्षा राजकीय शक्तिप्रदर्शनालाच अधिक महत्त्व दिले जात असल्याची भावना सभासदांतून व्यक्त होत आहे.

तब्बल ४३ अंश सेल्सिअस तापमानात उमेदवारांची गावोगावी प्रचारासाठी धावपळ सुरू असून सहकाराच्या नावाखाली राजकीय ताकद दाखविण्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी उभी राहिलेली संस्था आज अस्तित्व टिकविण्याच्या संघर्षात असताना, तिच्या पुनरुज्जीवनासाठी ठोस आराखडा मांडण्याऐवजी पॅनल विरुद्ध पॅनल अशी सरळ राजकीय लढत रंगत असल्याची चर्चा सुरू आहे. शेतकरी सहकारी संघाच्या १५ संचालक पदांसाठी एकूण ४४ उमेदवार रिंगणात उतरले असून निवडणूक पूर्णपणे तिरंगी झाली आहे. माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील आणि माजी आमदार कृषिभूषण साहेबराव धोंडू पाटील यांच्या नेतृत्वाखालील “सहकार पॅनल” ने सर्व १५ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर खासदार स्मिता उदय वाघ यांच्या नेतृत्वाखालील “किसान विकास पॅनल” ने १४ उमेदवारांना संधी दिली आहे. काँग्रेसच्या पाठबळावर प्रा. सुभाष सुकलाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली “शेतकरी पॅनल” कडून १० उमेदवार मैदानात असून ५ अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे, माजी आमदार शिरीष चौधरी तसेच शिवसेना शिंदे गटाने या निवडणुकीपासून जवळपास अलिप्त भूमिका घेतल्याचे दिसून येत असून त्यांच्या गटाकडून एकही उमेदवार देण्यात आलेला नाही. त्यामुळे सत्ताधारी गटांमध्येच खरी प्रतिष्ठेची लढत रंगली असल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील शेतकरी सहकारी संघाचे १६ हजार ३३२ व्यक्तिशः सभासद आणि १०७ सोसायटी सभासद ग्रामीण व शहरी भागात विखुरलेले असल्याने प्रचारासाठी उमेदवारांची मोठी कसरत सुरू आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही निवडणूक होत असल्याने संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. दरम्यान, तिन्ही पॅनलमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान व माजी संचालक, माजी शेतकरी सहकारी संघ संचालक तसेच सहकार क्षेत्रातील जुन्या चेहऱ्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आल्याने “एक व्यक्ती – एक पद” या संकल्पनेला हरताळ फासल्याची प्रतिक्रिया सामान्य सभासदांतून उमटत आहे. सहकारात पक्षीय राजकारण नसते, असा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात आयाराम-गयारामांची संख्या वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतकरी सहकारी संघ आर्थिक संकटातून जात असताना आणि संस्थेला सक्षम नेतृत्वाची गरज असताना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कोणत्याही स्तरावर ठोस प्रयत्न झाले नसल्याची चर्चा रंगत आहे. विशेष म्हणजे धुळे रोडलगत असलेल्या संघाच्या मौल्यवान जागेवर सर्वपक्षीय नेत्यांचा डोळा असल्याची चर्चा असून तिरंगी लढतीमुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक मातब्बर उमेदवार मैदानात असल्याने निवडणुकीत आर्थिक उलाढाली वाढण्याची चर्चा देखील जोर धरू लागली आहे. मतदारांना “लक्ष्मी दर्शन” घडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत असून प्रचाराच्या अंतिम टप्प्यात समीकरणे आणखी वेगाने बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *