
शेतकी संघ निवडणुकीत तिरंगी लढतीचे संकेत१५ जागांसाठी १५५ उमेदवार रिंगणात; माघारीच्या अखेरच्या दिवसाकडे लक्ष
अमळनेर (प्रतिनिधी) तालुका शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत यंदा मोठी चुरस निर्माण झाली असून एकूण १५५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत केवळ पाच उमेदवारांनी प्रत्येकी एका जागेवरील अर्ज मागे घेतला असला, तरी इतर मतदारसंघांमध्ये त्यांचे अर्ज कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी २० मे ही अखेरची मुदत असून, या शेवटच्या दिवशी कोण उमेदवारी कायम ठेवतो आणि कोण माघार घेतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केल्याने तिरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत. संघ आर्थिक संकटातून जात असतानाही निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर उत्सुकता दिसून येत आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही निवडणूक होत असल्याने ती प्रतिष्ठेची बनली आहे. आतापर्यंत श्रीनाथ रविंद्र पाटील (शहापूर), सुरेश अर्जुन पाटील (सुंदरपट्टी), दीपक वसंतराव पाटील (झाडी), विजय शेखनाथ पाटील (झाडी) आणि सचिन योगराज पाटील (पाडळसरे) यांनी प्रत्येकी एका जागेवरील अर्ज मागे घेतले आहेत. दरम्यान, एकूण १५ जागांसाठी ही निवडणूक होत असून व्यक्तिशः आणि सोसायटी मतदारसंघातील प्रत्येकी पाच जागांसाठी सर्वाधिक चुरस निर्माण झाली आहे. इतर प्रवर्गांमध्येही अनेक इच्छुक निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.
२० मे रोजी उमेदवारी माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २१ मे रोजी चिन्ह वाटप होणार आहे. त्यानंतर ३० मे रोजी मतदान, तर ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
संघ आर्थिक अडचणीत असला तरी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अनेक उमेदवार आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि प्रभावी मानले जात असल्याने या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उमेदवारांची प्रवर्गनिहाय संख्या
शेतकी संघाच्या निवडणुकीत व्यक्तिशः मतदारसंघातून ६८, सोसायटी मतदारसंघातून ३६, महिला प्रवर्गातून १६, ओबीसी प्रवर्गातून १९, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून ६, तर व्हीजेएनटी प्रवर्गातून १० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी आतापर्यंत पाच अर्ज मागे घेण्यात आले आहेत. यापैकी आतापर्यंत पाच अर्ज मागे घेण्यात आले आहेत.

Leave a Reply