अमळनेरमध्ये पेट्रोल-डिझेल टंचाई; “नो स्टॉक” फलकांमुळे नागरिक हैराण, शेतीकामांवरही परिणाम

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहर व तालुक्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर इंधनाचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून अनेक ठिकाणी पंपाबाहेर “नो स्टॉक”चे फलक लावण्यात आले आहेत. पेट्रोल व डिझेल मिळत नसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.

इंधनाचे दर वाढणार असल्याच्या चर्चांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून उपलब्ध इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र पुरवठा कमी आणि मागणी वाढल्याने अनेकांना पेट्रोल व डिझेल मिळत नसल्याची परिस्थिती आहे.

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने अनेकजण कुटुंबासह प्रवास करत आहेत. अशा वेळी इंधनटंचाईमुळे त्यांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. काही वाहनधारकांनी पेट्रोल मिळत नसल्याने वाहने जागीच उभी केली असून काहींना वाहने ढकलत नेण्याची वेळ आली आहे. दरम्यान, खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला वेग आला असताना शेतकऱ्यांना देखील या टंचाईचा मोठा फटका बसत आहे. ट्रॅक्टरसाठी डिझेल उपलब्ध नसल्याने मशागतीची कामे खोळंबली असून शेती व्यवस्थापनावर परिणाम होत आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार असल्याच्या सोशल मीडियावरील बातम्यांमुळे काही नागरिकांकडून साठेबाजी केली जात असल्याची चर्चा आहे. तसेच काही पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध असूनही ते वितरित केले जात नसल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून इंधनाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *