बोरी नदीत प्लास्टिक मुक्त अभियान; एकाच तासात तीन घंटागाड्या भरतील इतका कचरा केला संकलित

सखाराम महाराज यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एनएसएसचा पुढाकार; नागरिकांना सिंगल यूज प्लास्टिक टाळण्याचे आवाहन

 

अमळनेर (प्रतिनिधी) श्री संत सद्गुरु सखाराम महाराज यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) कक्षातर्फे रविवारी सकाळी ६ वाजता बोरी नदीपात्रात ‘प्लास्टिक मुक्त अभियान’ यशस्वीपणे राबविण्यात आले.

या मोहिमेदरम्यान शीतपेय व पाण्याच्या बाटल्या, गुटख्याचे रॅपर्स, सौंदर्यप्रसाधनांचे प्लास्टिक आवरण, खेळण्यांचे प्लास्टिक मोठ्या प्रमाणात गोळा करण्यात आले. अवघ्या एका तासात तीन घंटागाड्या भरतील एवढा प्लास्टिक कचरा नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. एनएसएस विभागाने यावेळी नागरिकांना इशारा देत सांगितले की, प्लास्टिकचा बेछूट वापर सुरू राहिल्यास भविष्यात पर्यावरणीय व वैद्यकीय समस्या गंभीर स्वरूप धारण करतील. बोरी नदीसारखी जीवनदायिनी नदी प्रदूषित होऊन जमीन नापीक होण्याचा धोका आहे, तसेच कॅन्सरसारख्या आजारांचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे सर्वांनी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळावा, प्लास्टिक कचरा नगरपरिषदेच्या डस्टबिनमध्येच टाकावा आणि यात्रोत्सवादरम्यान प्लास्टिकचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमासाठी विद्यापीठाचे संचालक डॉ. व्ही. एम. रोकडे, नवनियुक्त संचालक डॉ. प्रवीण महाले, राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, प्रताप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एच. डी. जाधव, सचिव प्रा. डॉ. पराग पाटील, सहसचिव डॉ. मांटे, उपप्राचार्य अमृत अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले.

तसेच डॉ. शशिकांत पाटील, डॉ. दिलीप राठोड, डॉ. राजपूत, डॉ. सावळे, प्रा. डॉ. सतीश पारधी, डॉ. वाघमारे, डॉ. खेडकर, डॉ. तोंडे, डॉ. पवन पाटील, डॉ. आय. एस. पाटील, डॉ. नलिनी पाटील, डॉ. अनिल महाले, महेश माळी, प्रशांत वंजारी यांच्यासह विविध महाविद्यालयांचे एनएसएस स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महिला योगा ग्रुपच्या उर्मिला अग्रवाल, पद्मजा पाटील, अंजू ढवळे, सविता पाटील, सुरेखा खैरनार, वनश्री अमृतकार, शर्मिला बडगुजर, अलका सोनार, सुनिता करंजे तसेच अमळनेर महिला मंचच्या तिलोत्तमा पाटील, वसुंधरा लांडगे, माधुरी पाटील, कांचन शहा यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. प्रताप तत्त्वज्ञान केंद्राचे गोपाल महाजन, गिरीश चौधरी, कमलेश पाटील, डॉ. मनीष करंजे तसेच अमळनेर नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर उपक्रमाचे श्री संत सद्गुरु सखाराम महाराज संस्थानतर्फे कौतुक व अभिनंदन करण्यात आले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *