पॅजो रिक्षा फरशी पुलावर पलटी; महिलेचा मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) ढेकू ते आटाळे रस्त्यावर पॅजो रिक्षा फरशी पुलावर पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सहा महिला जखमी झाल्याची घटना २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दीपक रोहिदास सोनवणे (रा. ढेकू, अंबासन) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मनोहर दिलीप चौधरी (रा. पिंपळे ) यांच्या मालकीची पॅजो रिक्षा क्रमांक एमएच १९ एएक्स १९०७ मधून जिजाबाई रोहिदास पाटील तसेच निर्मलाबाई एकनाथ भिल्ल, रजूबाई हिरामण भिल्ल, कलमबाई दिलीप पवार, ज्ञानेश्वर परशुराम भिल्ल, प्रमिलाबाई अजय जाधव आणि लताबाई पुंजू भिल्ल हे मजुरीच्या कामासाठी पिंपळे येथे गेले होते. मजुरीचे काम आटोपून सर्वजण पॅजो रिक्षाने परतत असताना ढेकू गावाच्या आधी असलेल्या फरशी पुलावर चालक मनोहर चौधरी याने रिक्षा बेदरकारपणे चालविल्याने ती अचानक पलटी झाली. या अपघातात रिक्षातील सर्व प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. जखमींना तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, जिजाबाई रोहिदास पाटील ( वय ५५ वर्षे), यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात इतर सहा महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मजुरीसाठी गेलेल्या महिलांवर परतीच्या प्रवासात काळाचा घाला घातल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी दीपक रोहिदास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात पॅजो रिक्षाचालक मनोहर दिलीप चौधरी याच्याविरुद्ध बेदरकारपणे वाहन चालवून जिजाबाई यांच्या मृत्यूस तसेच इतर प्रवाशांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *