अमळनेरमध्ये पाणीटंचाईवरून आमदार अनिल पाटील आक्रमक

दहा-दहा दिवस पाणी नाही; सुरळीत पुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आमदार यांनी नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. जनतेच्या जीवावर सत्ता मिळवून दोन दिवसाआड पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र ते पूर्णपणे फोल ठरल्याचा आरोप त्यांनी केला.

आमदार अनिल पाटील यांनी म्हटले आहे की, गेल्या दीड महिन्यापासून शहरभर पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून सत्ताधाऱ्यांना त्याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

अमळनेरकर नियमितपणे पाणीपट्टी कर भरत असताना देखील मूलभूत सुविधा मिळत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये नागरिकांना दहा-दहा दिवस प्यायला पाणी मिळत नसल्याने मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून टाक्या व्यवस्थित भरल्या जात नाहीत. दहा दिवसांनी होणारा पाणीपुरवठाही कमी दाबाने होत असल्याचा आरोप त्यांनी केला. जळोद डोहातील पाणी आटत असल्याने गंगापुरी डोहातून पाणी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी खर्च होत असला तरी आवर्तन घेण्यास टाळाटाळ का केली जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “आवर्तनासाठी ४० लाख रुपये खर्च झाले तरी हरकत नाही, तो जनतेचाच पैसा आहे. एक काम कमी करा पण जनतेला पाणी द्या,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

पालिकेतील काही नगरसेवक स्वतःच्या भागात जादा पाणी सोडून घेण्यासाठी पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांवर दबाव आणत असल्याच्या तक्रारीही आपल्याकडे आल्याचे त्यांनी सांगितले. सुरळीत पाणीपुरवठ्याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास शहर विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

 

२०० कोटींची पाणीपुरवठा योजना थंडबस्त्यात

 

शहराची पुढील ५० ते ६० वर्षांची पाण्याची गरज लक्षात घेऊन मंजूर करण्यात आलेल्या २०० कोटींच्या ‘२४ बाय ७’ पाणीपुरवठा योजनेचे कामही सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी थंडबस्त्यात टाकल्याचा आरोप आमदार यांनी केला. धरणावरून मंजूर करून या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती व शहरात पाइपलाइन टाकण्याचे कामही सुरू झाले होते. मात्र नागरिकांबद्दल आस्था नसल्याने या योजनेला गती मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले. लवकरच या कामाकडे स्वतः लक्ष घालून गती देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

यात्रोत्सवाच्या नियोजनावरही टीका

 

बोरी पात्रातील यात्रोत्सवात प्रथमच ठेकेदारी आणि वसुलीचा प्रयोग करण्यात आल्याने बाहेरगावाहून आलेले विक्रेते व पाळणेवाले नाराज झाले असून संपूर्ण नियोजन कोलमडल्याचा आरोपही त्यांनी केला. अनेक वर्षांच्या धार्मिक व भावनिक परंपरेला धक्का लागल्याचे त्यांनी म्हटले.

नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना “खेळण्यातले बाहुले” बनवून ठेवण्यात आल्याची टीका करत, लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधींना स्वायत्तपणे काम करू द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *