
अमळनेरात ९ ऑगस्टला मशाल पेटणार; सरकारच्या धोरणांविरोधात ‘चलो तिरंगा चौक’चा एल्गार
अमळनेर (प्रतिनिधी) क्रांती दिनाचे औचित्य साधत रविवार, ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर शहरात ‘चलो तिरंगा चौक’ या घोषणेसह मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध धोरणांचा निषेध करण्याबरोबरच शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
महागाईचा वाढता बोजा, पेट्रोल-डिझेल आणि वीज दरवाढ, महागडी औषधे, बेरोजगारी, शिक्षण क्षेत्रातील पेपरफुटी, शाळा बंद होण्याचे प्रकार, भ्रष्टाचार, जातीय ध्रुवीकरण, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील अत्याचार तसेच रस्ते आणि पुलांची दुरवस्था यांसह विविध प्रश्न मोर्चातून उपस्थित करण्यात येणार आहेत.
अतिवृष्टीग्रस्तांना ५० हजारांची तातडीची मदत मागणार
अमळनेर तालुक्यात ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी मोर्चातून करण्यात येणार आहे.
शहरासह ग्रामीण भागातील नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करावेत, तसेच पूरग्रस्त भागात स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी आणि आवश्यक वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात येणार आहे.
पाडळसरेसाठी दरवर्षी ५०० कोटींची मागणी
अमळनेर तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पाडळसरे धरणासाठी दरवर्षी ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही मोर्चातून करण्यात येणार आहे.
यासोबतच शेतमालाला हमीभाव मिळावा आणि केंद्रीय पीक विमा योजनेतील पीक कापणी प्रयोगाचा निकष रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य दर आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रभावी आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका आयोजकांनी मांडली आहे.
ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी
निवडणूक प्रक्रियेबाबतही मोर्चातून मागणी करण्यात येणार असून, ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे, अशी भूमिका आयोजकांनी घेतली आहे.
विविध संघटनांचा मोर्चात सहभाग
या मशाल मोर्चात महाविकास आघाडीसह मराठा सेवा संघ, मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशन, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, एनएसयूआय, निवृत्त सेवा संघटना, पुरोगामी क्रांती दल, प्रहार संघटना आणि साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान यांच्यासह विविध संघटना सहभागी होणार आहेत.
क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मशाल मोर्चातून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात आवाज बुलंद करण्यासोबतच स्थानिक पातळीवरील शेतकरी, पूरग्रस्त, विद्यार्थी, महिला, बेरोजगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात येणार आहे.
मोर्चात अमळनेर शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply