अमळनेर नगरपरिषदेतर्फे भटक्या कुत्र्यांची नसबंदी, लसीकरण मोहीम सुरू

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासह नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने प्राणी जन्मनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांची नसबंदी तसेच रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे.

नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रक्रियेंतर्गत शहरातील भटक्या कुत्र्यांना नियमानुसार पकडून प्राणी जन्मनियंत्रण केंद्रात नेण्यात येणार आहे. तेथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात येईल. शस्त्रक्रियेनंतर त्यांची योग्य काळजी घेऊन त्यांना पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात येणार आहे.

याचाच एक भाग म्हणून नुकतीच ढेकू रोड परिसरात भटक्या कुत्र्यांना पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील इतर भागांतही टप्प्याटप्प्याने ही कार्यवाही राबविण्यात येणार आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेसह भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवणे आणि रेबीजसारख्या गंभीर आजाराचा प्रसार रोखण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची आहे. त्यामुळे कुत्रे पकडण्याची कार्यवाही सुरू असताना नागरिकांनी घाबरून न जाता तसेच अफवा न पसरविता नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अमळनेर नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *