
अमळनेर येथे बनावट देशी-विदेशी मद्यनिर्मिती, अवैध वाहतूक प्रकरणी केली धडक कारवाई
दोन जण अटकेत, ३ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात अवैधरित्या बनावट देशी-विदेशी मद्यनिर्मिती व वाहतूक करणाऱ्या टोळीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ३,०१,७३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, संचालक (अं. व दक्षता) प्रसाद सुर्वे, विभागीय उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग उषा वर्मा आणि अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दुय्यम निरीक्षक जी. एस. मोरे, राज्य उत्पादन शुल्क, चोपडा-२ अमळनेर व निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चोपडा विभाग, जि. जळगाव यांच्या पथकाला मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीनुसार १२ फेब्रुवारी रोजी जवखेडे-मांडळ रोड, विहिरीजवळ, मांडळ (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथे सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी भावलाल सुकदेव पारवे (वय ३०, रा. नवलनगर, ता. जि. धुळे) हा अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक करताना आढळून आला. तसेच आरोपी दिनेश प्रभाकर खंबायत (वय ४६, रा. आर. के. नगर, धुळे रोड, अमळनेर, जि. जळगाव) याच्या राहत्या घरी रात्री ९.१० वाजता छापा टाकण्यात आला. तेथे बनावट देशी-विदेशी मद्यनिर्मिती सुरू असल्याचे आढळून आले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर बनावट मद्यसाठा मोठ्या प्रमाणावर आढळून आल्यामुळे आंतरराज्य मद्य तस्करी करणारी टोळी कार्यरत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्या अनुषंगाने सखोल तपास सुरू आहे. ही कारवाई दुय्यम निरीक्षक जी. एस. मोरे, राज्य उत्पादन शुल्क, चोपडा-२ अमळनेर व निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चोपडा विभाग अ. कै. सु. मोमीन यांच्या नेतृत्वाखाली जवान विपुल राजपूत, दिनेश पाटील, भूषण परदेशी, शशिकांत पाटील आणि सुषमा सुलताने यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या गुन्ह्याचा पुढील तपास विभागीय उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग उषा वर्मा आणि अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक जी. एस. मोरे हे करीत आहेत.
जप्त केलेला मुद्देमाल असा
या कारवाईत हीरो होंडा डिलक्स (ब्लू-ब्लॅक) दुचाकी क्र. एमएच १८ सीजी १५४९ (८५,००० रु), १८० मि.ली. क्षमतेच्या मॅकडॉल नं.१ विदेशी मद्याच्या बनावट ४८ सीलबंद बाटल्या (१०,५६० रु.), देशी दारू टँगो पंच बुच ६१० नग (१,२२० रु.), देशी दारू टॅगो पंच ९० मि.ली. प्लॅस्टिक बाटल्या ११५ नग (३४५ रु.), देशी दारू भींगरी बुच ९० नग (१८० रु.), मॅकडॉल नं.१ व्हिस्की बुच १०० नग ( (३०० रु.) मॅकडॉल नं.१ व्हिस्की कॅप ११० नग (३३० रु.), देशी दारू टॅगोपंच ९० मि.ली. सीलबंद बॉक्स (१०० नग, ४,००० रु.), १०० लिटर प्लॅस्टिक ड्रम (देशी दारू निर्मितीसाठी, ४५,००० रु.), १० टिन (३५ लिटर क्षमतेचे प्लॅस्टिक कॅन) एकूण १०५ लिटर तयार दारू (४७,२५० रु.), बनावट मद्य सीलिंग मशीन (२५,००० रु.), २५ लिटर पाण्याच्या जारमध्ये तयार विदेशी मद्य (३०,५५० रु.), ब्लेड (१३ रु.), ऑर्किड कंपनीची छोटी मोटर (६००रु.), दोन प्लॅस्टिक नळ्या (१०० रु.), पाच प्लॅस्टिक ट्रे (१,००० रु.), हीरो होंडा मोटरसायकल (काळी) क्र. एमएच १५ सीए ०७७४ (५०,००० रु.), देशी व विदेशी मद्यनिर्मितीसाठी वापरले जाणारे अर्क व स्वाद (३००रु.), एकूण जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत ३,०१,७३५ रुपये.

Leave a Reply