जन्मानंतर नवजात बाळाला नाल्यात फेकल्याप्रकरणी महिलेला तीन वर्षांची शिक्षा

अमळनेर (प्रतिनिधी) प्रसूतीनंतर जन्मलेल्या नवजात बाळाला नाल्यात फेकून दिल्याप्रकरणी चोपडा तालुक्यातील एका महिलेला अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश छाया पाटील यांनी हा निकाल दिला.

याबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना ६ ऑगस्ट २०२२ रोजी चोपडा तालुक्यातील एका गावात घडली होती. गावात उत्तरकार्याचा कार्यक्रम सुरू असताना काही नागरिकांना नाल्याकडून नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी तातडीने गावातील पोलीस पाटलाला याची माहिती दिली. पोलीस पाटलाने नाल्यात पडलेल्या नवजात बाळाला बाहेर काढून कापडात गुंडाळले आणि उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे बाळाचा जीव वाचला.

या घटनेनंतर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सखोल तपास सुरू करत गावातील नुकत्याच प्रसूत झालेल्या आणि आरोग्य विभागाकडे नोंद असलेल्या महिलांची पडताळणी केली. तसेच आशा स्वयंसेविका आणि आरोग्य परिचारिकांच्या मदतीने गावात शोधमोहीम राबविण्यात आली.

तपासादरम्यान एका महिलेची प्रसूती झाल्याची अधिकृत नोंद नसल्याचे आढळून आले. संशयाच्या आधारे तिची चौकशी करण्यात आली असता तिने नवजात बाळाला नाल्यात फेकून दिल्याची कबुली दिली. त्यानंतर संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा खटला अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात चालला. सरकारी पक्षातर्फे ॲड. किशोर बागुल मंगरुळकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. खटल्यादरम्यान पोलीस पाटील, आशा सेविका, डॉक्टर यांच्या साक्षी तसेच डीएनए अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश छाया पाटील यांनी संबंधित महिलेला दोषी ठरवत तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *