
पर्यावरण दिनानिमित्त वामन नगरातील मियावाकी ऑक्सिजन पार्कमध्ये वृक्षारोपण
विप्रो फॅक्टरी व आधार संस्थेचा संयुक्त उपक्रम; हरित अमळनेरसाठी उचलले सकारात्मक पाऊल

अमळनेर (प्रतिनिधी) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अमळनेर येथील विप्रो फॅक्टरी आणि आधार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वामन नगर परिसरातील मियावाकी ऑक्सिजन पार्कमध्ये वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शहराचा हरितपट्टा वाढविण्यासाठी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
पर्यावरणाचे संतुलन राखणे, वाढते प्रदूषण कमी करणे आणि भावी पिढ्यांसाठी निरोगी पर्यावरण निर्माण करणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रकल्पांतर्गत वामन नगर परिसरात दहा विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. या वृक्षांमुळे परिसरात अधिक हिरवळ निर्माण होण्यास मदत होणार असून भविष्यात हा भाग पर्यावरणपूरक आणि ऑक्सिजनयुक्त क्षेत्र म्हणून विकसित होणार आहे. या उपक्रमात विप्रो केअरच्या वतीने किशोर गुरव (सेफ्टी ऑफिसर), दर्शन चौधरी (क्वालिटी ऑफिसर), संदीप मोरे (अकाउंट्स ऑफिसर), प्रशांत सैंदाने (परचेस ऑफिसर) आणि सुधीर बडगुजर (वेलफेअर ऑफिसर) यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच आधार संस्थेचे प्रतिनिधी राकेश महाजन आणि अश्विनी भदाणे यांनीही वृक्षारोपण मोहिमेत सहभाग नोंदविला.
यावेळी उपस्थितांनी वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा उपक्रम नसून पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. शहरातील हरित क्षेत्र वाढवून पर्यावरण रक्षणासाठी सकारात्मक योगदान देण्याचा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली. वृक्ष लागवडीसह त्यांचे संवर्धन आणि संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply