
आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; शाळा-महाविद्यालयांतून निरोगी जीवनशैलीचा संदेश
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्थैर्य, एकाग्रता आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटवून देण्यात आले.
कै. श्री दादासाहेब व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री दादासाहेब व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल, अमळनेर येथे “योगा फॉर वन अर्थ, वन हेल्थ” या संकल्पनेनुसार आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील प्रसिद्ध योगप्रशिक्षक रघुनाथ चौधरी यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रार्थनेने झाली. त्यानंतर विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचा सराव केला. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य कसे सुदृढ राहते याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी शाळेच्या सचिव सौ. अलका पवार यांनी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अधोरेखित करत प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध योगासने उत्कृष्टरीत्या सादर केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. “निरोगी शरीर, शांत मन आणि सुदृढ राष्ट्र घडविण्यासाठी योग हीच जीवनशैली” हा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.
कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड
तसेच ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड येथेही आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. देवदत्त पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने करून दाखवत योगाचे आरोग्यदायी महत्त्व आणि तणावमुक्त जीवनासाठी त्याची उपयुक्तता विषद केली. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतिश पारधी, डॉ. दिलीप कदम, डॉ. जितेंद्र माळी, डॉ. पवन पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. संजय महाजन, प्रा. विजय पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. सर्वांनी योगाभ्यासात सहभागी होत निरोगी जीवनाचा संकल्प केला.

Leave a Reply