
दुष्काळाच्या झळांतही मंगळग्रह सेवा संस्थेने जपली माणुसकी; ८५ गरजू कुटुंबांची दिवाळी केली गोड!
अमळनेर (प्रतिनिधी) एका बाजूला दुष्काळाचे सावट आणि दुसरीकडे दिवाळीचा सण अशा परिस्थितीत गरजू कुटुंबांच्याही घरात आनंदाचा दीप उजळावा, या सामाजिक बांधिलकीतून मंगळग्रह सेवा संस्थेने माणुसकीचा उपक्रम हाती घेतला आहे. संस्थेतर्फे तालुक्यातील विविध गावांमध्ये गरजवंतांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात येत असून, शुक्रवारी (दि. ६ नोव्हेंबर) तासखेडे येथे जवळपास ८५ गरजू कुटुंबांना फराळाची पाकिटे वितरित करण्यात आली.
या उपक्रमाप्रसंगी गावाचे सरपंच सुनील पाटील, मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, मंगल सेवेकरी प्रकाश मेघा, बाळा पवार मंदिराचे सेवेकरी, गावातील दगा भील, बापू बिऱ्हाडे, सांडू बिऱ्हाडे, संतोष पाटील, मच्छिंद्र पाटील आदींसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गरजू शेतकरी, शेतमजूर आणि अन्य घटकांना फराळ, कपडे व अन्नधान्याच्या स्वरूपात मदत मिळावी, यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. सणाच्या आनंदात गरजू कुटुंबांनाही सहभागी करून घेणाऱ्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा संदेश देण्यात आला.

Leave a Reply