
ताडेपुरा पैलाड येथे नवीन स्मशानभूमीचे काम पुन्हा सुरू; मृतदेहाची विटंबना थांबणार
अमळनेर (प्रतिनिधी) येथील ताडेपुरा पैलाड भागातील नवीन स्मशानभूमीचे पूर्णत्वाचे काम अखेर पुन्हा सुरू झाले आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मृतदेहाची खाली विटंबना होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर या कामाला गती मिळाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर नगरपरिषद अंतर्गत ताडेपुरा पैलाड भागात नवीन स्मशानभूमीचे सुमारे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र जुन्या स्मशानभूमीतील तिन्ही दहन बेड तुटलेल्या अवस्थेत असल्याने अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मृतदेहांचे जमिनीवर दहन करावे लागत होते. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांच्या भावना दुखावल्या जात होत्या. नवीन स्मशानभूमीच्या कामाचे बिल जिल्हास्तरावरून प्राप्त झाले होते, मात्र ऑडिट अपूर्ण असल्याचे कारण देत पालिकेकडून ठेकेदाराला बिल अदा करण्यात आले नव्हते. परिणामी ठेकेदारानेही काम पूर्ण केले नव्हते. यामुळे स्मशानभूमीचे काम रखडले होते आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. याबाबत वृत्त प्रसिद्ध करून सत्ताधारी व विरोधकांनी राजकारण बाजूला ठेवून काम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले होते. पालिकेने ठेकेदाराला काम पूर्ण करण्याच्या नोटिसाही दिल्या होत्या.
अखेर वृत्ताची दखल घेत ठेकेदाराने सकारात्मक प्रतिसाद देत माणुसकीच्या भावनेतून काम पुन्हा सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच स्मशानभूमीचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
लवकरच काम पूर्ण करू
“जनतेच्या भावनांशी खेळणे योग्य नव्हते. बिल मिळण्यापेक्षा जनहित महत्त्वाचे आहे. अंतिम समयी मृतदेहांचे हाल होऊ नयेत म्हणून काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच काम पूर्ण करू.
–मिहीर हेमंत पवार, ठेकेदार

Leave a Reply