अमळनेरमधील ५.२७ लाखांच्या लूटमारीचा लागला छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; दीड लाखांची रोकड जप्त

 

अमळनेर (प्रतिनिधी) भरदिवसा व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून ५ लाख २७ हजार रुपयांची रोकड लुटणाऱ्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी धुळे येथील एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी शिताफीने अटक केली असून, त्याच्याकडून दीड लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.

​याबाबत आशिक माहिती अशी की,  दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०. ५५ वाजेच्या सुमारास अमळनेर येथील ‘लामा जिनिंग’चे मालक यतीन विनोद कोठारी (वय ४८) हे आपल्या दुचाकीवरून (एम एच -19-बीसी -1465) ५ लाख २७ हजार रुपयांची रोकड घेऊन जिनिंगकडे जात होते. पिंपळे रोडवर दबा धरून बसलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्यांना अडवले. आरोपींनी कोठारी यांचा चष्मा बळजबरीने काढून त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली आणि पैशांची बॅग घेऊन पोबारा केला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईत दीड लाख रुपयांची रिकव्हरी करण्यात आली आहे. उर्वरित दोन फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम आणि पीएसआय शरद काकळीजे तपास करत आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, आणि डीवायएसपी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे राहुल गायकवाड, जितेंद्र वल्टे, संदीप पाटील, हरिलाल पाटील, प्रवीण मांडोळे, राहुल कोळी, दिपक चौधरी, गौरव पाटील आणि मिलींद जाधव यांनी केली आहे.

 

असा लागला तपासाचा छडा

 

​घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी समांतर तपासाचे आदेश दिले होते. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय जितेंद्र वल्टे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळवली. तपासात या गुन्ह्यात धुळ्याचा सराईत गुन्हेगार मनोज खुशाल उर्फ अशोक मोकळ याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून मनोजला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

 

अटक आरोपीचा गुन्हेगारी इतिहास

 

आरोपी मनोज खुशाल उर्फ अशोक मोकळ (वय २६, रा. दंडेवाला नगर, मोहाडी, जि. धुळे) हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून यापूर्वी मार्च २०२१ मध्ये त्याने जळगावच्या पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात बंदुकीचा धाक दाखवून १५ लाखांची बॅग लिफ्टिंग केली होती.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *