बिबट्याच्या वावराने घाबरू नका, मात्र सतर्क राहा; आमदार अनिलदादा पाटील यांचे आवाहन

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून विविध ठिकाणी बिबट्या आढळल्याच्या घटना आणि चर्चांमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः नंदगाव शिवारात एका व्यक्तीवर हल्ला झाल्याची घटना, परिसरातील शेतशिवारात बिबट्याच्या पाऊलखुणा आढळणे तसेच अंतुर्ली परिसरात रात्रीच्या वेळी डोळे चमकणारा प्राणी दिसल्याची चर्चा यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. याशिवाय ढेकू रस्त्यावर बकऱ्या चारणाऱ्या व्यक्तीला बिबट्या दिसल्याची वार्ता पसरली होती. काल पिळोदा, धुपी आणि देवळी शिवारातही बिबट्याचा वावर असल्याची चर्चा झाली. पपईच्या शेतात बिबट्या लपल्याचे आणि त्यानंतर मक्याच्या शेतात दिसल्याचे सांगितले जात असल्याने शेतकरी व शेतमजूर भयभीत झाले होते. या माहितीची दखल घेत वन विभागाचे अधिकारी तातडीने संबंधित परिसरात दाखल झाले आणि पाहणी केली.

या पार्श्वभूमीवर आमदार अनिल भाईदास पाटील यांनी वन अधिकारी छत्रपती चव्हाण यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली तसेच वन विभागाला अधिक दक्ष राहण्याच्या सूचना केल्या. नागरिकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

काय म्हणाले आमदार अनिलदादा पाटील?

 

“अमळनेर तालुक्यात बिबट्या आढळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नागरिकांनी ही बाब केवळ अफवा समजून बेसावध राहू नये, तसेच विनाकारण पॅनिक होऊन घाबरूनही जाऊ नये.सर्व नागरिकांनी, विशेषतः शेतकरी बांधवांनी रात्री-अपरात्री एकट्याने शेतात जाणे टाळावे. शेतात जाताना सोबत २-३ जणांनी जावे, हातात बॅटरी, काठी ठेवावी. लहान मुलांना एकटे शेतात किंवा घराबाहेर सोडू नये. आपली व आपल्या जनावरांची काळजी घ्यावी.”

 

वन विभाग सतर्क; दोन पिंजरे लावले

 

आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सांगितले की, घटनांची माहिती मिळताच वन विभागाला सतर्क करण्यात आले आहे. वन विभागाने तालुक्यात दोन ठिकाणी पिंजरे लावले असून त्यात सावज म्हणून बकरी ठेवण्यात आली आहे. मात्र रात्री-अपरात्री शेतरस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा आवाज आणि वर्दळ यामुळे हा हिंस्त्र प्राणी पिंजऱ्याजवळ येत नसावा, असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

 

नागरिकांनी कोणतीही अफवा पसरवू नये

 

“मी स्वतः वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. वन विभागाचे पथक गस्त घालत आहे. लवकरात लवकर बिबट्याचा वावर असेलच तर त्याला जेरबंद करून नागरिकांना दिलासा दिला जाईल. नागरिकांनी कोणतीही अफवा पसरवू नये आणि काही संशयास्पद दिसल्यास तात्काळ वन विभाग किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

-अनिलदादा पाटील, आमदार

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *