ट्रॅप कॅमेरे, पिंजरे लावूनही बिबट्या हाती लागेना; नंदगाव-अंतुर्ली परिसरात दहशत कायम

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सानेनगरजवळ बोरी नदीकाठच्या नंदगाव शिवारात तरुणावर हल्ला करणारा बिबट्या अद्याप वन विभागाच्या हाती लागलेला नसल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा तसेच ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असतानाही त्याचा ठावठिकाणा स्पष्ट होत नसल्याने वन विभागासमोरही संभ्रम निर्माण झाला आहे.

पहिल्या दिवशी वन विभागाने पिंजऱ्यात बकरी ठेवून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकलाच नाही. तसेच परिसरात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यातही त्याचे छायाचित्र कैद झालेले नाही. त्यामुळे संबंधित प्राणी नेमका बिबट्याच आहे की अन्य कोणता हिंस्त्र प्राणी, याबाबत वन विभागाकडून स्पष्टता नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये हा बिबट्याच असल्याची चर्चा असून त्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, काल रात्री वन विभागाने पुन्हा पिंजऱ्यात बकरी ठेवून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातही बिबट्या हाती लागला नाही. विशेषतः सकाळी शेतात कामासाठी जाणाऱ्या शेतकरी आणि मजुरांमध्ये भीतीचे वातावरण असून, एकट्याने शेतात जाणे धोकादायक ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी रात्री अमळनेरकडे येत असताना अंतुर्ली येथील चौकीदारास रात्रीच्या वेळी डोळे चमकणारा प्राणी दिसल्याची चर्चा गावात पसरली आहे. या चर्चेमुळे अंतुर्लीसह परिसरातील गावांमध्ये रात्रीच्या वेळी बाहेर पडण्यास नागरिक घाबरत आहेत. त्यामुळे वन विभागाने परिसरात गस्त वाढवून या प्राण्याचा तातडीने शोध घ्यावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करून शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *