
लग्नासाठी अडीच लाख घेऊन आठ दिवसांत पत्नी फरार; अमळनेरात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) लग्नासाठी अडीच लाख रुपये घेतल्यानंतर अवघ्या आठ दिवसांत पत्नी फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा २ एप्रिल रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुकेश रमेश शिरसाठ (वय ३१, रा. सानेनगर, सध्या नोकरी – सूरत, गुजरात) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या बहिणीच्या सासऱ्यांच्या मध्यस्थीने दुर्गा गजानन थाटोड (रा. गायेगाव, ता. अकोला) हिच्याशी विवाह निश्चित झाला होता. विवाहासाठी मुकेश यांनी अडीच लाख रुपये दुर्गा, तिची मावशी नंदा व एका मध्यस्थी पुरुषाला दिले होते. ठरल्याप्रमाणे १० डिसेंबर २०२५ रोजी मध्यप्रदेशातील कुलदेवता बीजासनी माता मंदिर येथे साध्या पद्धतीने विवाह पार पडला. मात्र, २२ डिसेंबर रोजी सकाळी पत्नी दुर्गा घरातून निघून गेली आणि नंतर पतीसोबत राहण्यास नकार दिला. पैसे परत मागितल्यावर तिने “मला पैसे मिळाले नाहीत” असे सांगून टाळाटाळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. दरम्यान, ३० मार्च रोजी मुकेश यांना त्यांच्या परिचित सविता पाटील यांनी फोन करून दुर्गा ही वाघळूद (ता. धरणगाव) येथील राकेश पाथरवट याच्याशी दुसरे लग्न करत असल्याची माहिती दिली. यानंतर मुकेश यांनी पोलिसांच्या मदतीने तिचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. २ एप्रिल रोजी दुर्गा व तिचा सध्याचा पती राकेश पाथरवट अमळनेर पोलीस ठाण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर मुकेश यांनी तक्रार नोंदवली. त्यानुसार दुर्गा, तिची मावशी नंदा व एका अज्ञात पुरुषाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विनोद भोई करत आहेत.

Leave a Reply