
अमळनेर बसस्थानकात ईबीक्स प्रतिनिधीची विद्यार्थिनीशी गैरवर्तन; आगार व्यवस्थापकांकडे तक्रार
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर एसटी बसस्थानक परिसरात एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) तयार करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ईबीक्स प्रतिनिधीवर एका शालेय विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात खळबळ उडाली असून संबंधित विद्यार्थिनीचे पालक आणि ग्रामस्थांनी अमळनेर आगार व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अमळनेर आगारात ईबीक्स प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले उमेश शिवदे यांना एनसीएमसी कार्ड तयार करून देण्यासाठी प्रवासी पास कार्यालयाजवळ जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शनिवारी (दि. ५ जुलै) काही शालेय विद्यार्थिनी बसची प्रतीक्षा करत उभ्या असताना संबंधित प्रतिनिधीने त्यांना कार्यालयात बोलावून अयोग्य पद्धतीने संवाद साधल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच तक्रारीनुसार, संबंधित प्रतिनिधीने विद्यार्थिनींना “तुम्ही मला रोज भेटायला या, मी तुम्हाला रोज चॉकलेट देईन,” असे सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थिनी घाबरल्याने त्यांनी हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर संतप्त पालक व ग्रामस्थांनी आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी यांची भेट घेऊन लेखी तक्रार सादर केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आगार व्यवस्थापकांनी संपूर्ण प्रकरणाचा अहवाल विभागीय वाहतूक अधिकारी, जळगाव विभाग यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला आहे. तसेच तक्रारीची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. बसस्थानक परिसरात दररोज मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींची वर्दळ असते. त्यामुळे या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण असून विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणी संबंधित ईबीक्स प्रतिनिधीची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार असून प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील योग्य ती कारवाई करू
“संबंधित कर्मचाऱ्याविषयी यापूर्वीही कामातील हलगर्जीपणा आणि कामचुकारपणाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे त्याला ईबीक्स प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. आता त्याच्याविरुद्ध विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात कळविण्यात आली असून, त्यांच्या निर्देशानुसार पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल.”
— प्रमोद चौधरी, आगार प्रमुख, अमळनेर

Leave a Reply