
गांधली जलशुद्धीकरण केंद्रातील अवैध नळजोडणी प्रकरण तापले
३० दिवस उलटूनही कारवाई नाही; नगरपरिषदेला १० दिवसांचा अल्टिमेटम, आंदोलनाचा इशारा
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील गांधली जलशुद्धीकरण केंद्र परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध नळ कनेक्शन प्रकरणावर नगरपरिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत तक्रार दाखल करून तब्बल ३० दिवस उलटूनही प्रशासनाने प्रभावी पावले उचलली नसल्याने नागरिक व सामाजिक घटकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधितांनी नगरपरिषद प्रशासनाला १० दिवसांचा अंतिम अल्टिमेटम दिला असून, अवैध नळ कनेक्शन तात्काळ तोडण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. अन्यथा नगरपरिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन तसेच उपोषण छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गांधली जलशुद्धीकरण केंद्रात शासकीय नियमांचे उल्लंघन करून अनधिकृत पद्धतीने पाणी उपसा सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री कार्यवाही दाखवली जात असून प्रत्यक्षात कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या दिरंगाईमुळे शासकीय मालमत्ता आणि पाण्याच्या स्त्रोतांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे अमळनेर शहरात मोठी खळबळ उडाली असून पुढील १० दिवसांत प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मुख्य मागण्या अशा
गांधली जलशुद्धीकरण केंद्रातील सर्व अवैध नळ कनेक्शन तात्काळ बंद करण्यात यावेत. या प्रकरणात सामील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात यावे. झालेल्या आर्थिक नुकसानीची वसुली दोषींवरून करण्यात यावी. नगरपरिषद प्रशासनाने या इशाऱ्याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास होणाऱ्या जनआंदोलनास पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply