आनोरे येथे धनदाई महाविद्यालयात एकदिवसीय शेतकरी कार्यशाळा उत्साहात

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील आनोरे येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व धनदाई महाविद्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी सहाय्यता उपक्रमांतर्गत एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली.

कार्यशाळेचे उद्घाटन सिनेट सदस्य डॉ. संदीप नेरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून संजय पाटील, किशोर पाटील, नरेंद्र पाटील, विनोद पाटील, रायचंद पाटील, ग्रामसेवक नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यशाळेचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. जयवंतराव पाटील यांनी केले. यावेळी डॉ. नेरकर यांनी कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या संकल्पनेतून अशा कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.

पहिल्या सत्रात शेती अभ्यासक गोकुळ बोरसे यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेची कार्यपद्धती स्पष्ट करून शेतकऱ्यांनी सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सजग राहण्याचे आवाहन केले. तसेच औषधी वनस्पती व नगदी पिकांकडे वळण्याचा सल्लाही त्यांनी दिला. दुसऱ्या सत्रात डॉ. शैलेश वाघ यांनी कृषी पर्यटन हे उदयोन्मुख क्षेत्र असल्याचे सांगून खानदेशात याच्या विकासासाठी मोठी संधी असल्याचे स्पष्ट केले. पुढील सत्रात आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त अंबू नथ्थू पाटील यांनी आधुनिक शेती व नगदी पिकांवर मार्गदर्शन केले. ग्रामसेवक नितीन पाटील यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून अशा कार्यशाळांमुळे संवाद वाढून शेतीतील अडचणींवर उपाय शोधण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राहुल इंगळे यांनी केले. आभार डॉ. प्रशांत पाटील यांनी मानले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *