
निर्दयीपणे गुरांची वाहतूक करणाऱ्या शिरपूर येथील एका तरुणाला अटक
अमळनेर (प्रतिनिधी) निर्दयीपणे गुरांची वाहतूक करणाऱ्या शिरपूर येथील एका तरुणाला अटक करून वाहनासह सुमारे सव्वा दोन लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई १५ रोजी सकाळी ७ वाजता अमळनेर-शिरपूर रस्त्यावर मिलचाळ भागाजवळ करण्यात आली.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील के. जी. रोड, अंबिता नगर येथील सरफराजबेग फरीदबेग मिर्झा (वय २१) हा वाहन (क्रमांक एमएच १८ बीजी ९१२० ) मधून दोन गोऱ्हे कोंबून अमानुष पद्धतीने वाहतूक करताना आढळून आला. जनावरांना कोणतीही योग्य सोय न करता, त्यांना त्रास होईल अशा स्थितीत वाहनात कोंबण्यात आले होते.
या प्रकरणी गोपनीय शाखेचे सिद्धांत शिसोदे यांनी फिर्याद दिल्यानंतर अमळनेर पोलीस स्टेशन येथे सरफराज मिर्झा याच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यान्वये कलम ११(ड)(ई)(फ)(क), तसेच भारतीय न्यायसंहिता कलम ३(५) आणि मुंबई पोलीस कायदा कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून त्याच्या ताब्यातील अंदाजे २५ हजार रुपये किमतीची दोन गुरे आणि सुमारे दोन लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत. जनावरांची निर्दयी वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Leave a Reply