
डोळ्यांत भक्तिभाव, ओठांवर जयघोष… कानबाई मातेला भावपूर्ण निरोप
अमळनेर (प्रतिनिधी) : खानदेशातील पारंपरिक आणि श्रद्धेचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कानबाई मातेच्या उत्सवाची शहरासह तालुक्यात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. घराघरांत विधिवत स्थापना केलेल्या कानबाई मातेची पूजा-अर्चा, आरती आणि धार्मिक विधी केल्यानंतर भाविकांनी ढोल-ताशांच्या गजरात तसेच कानबाई मातेच्या जयघोषात विसर्जन मिरवणुका काढत मातेला भावपूर्ण निरोप दिला.

कानबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीत महिला, भगिनी, पुरुष तसेच तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. ढोल-डीजेच्या तालावर महिला व पुरुषांनी ठेका धरत कानबाई मातेच्या गीतांवर उत्स्फूर्त नृत्य केले. पारंपरिक गीते, भजने आणि डीजेच्या तालामुळे मिरवणुकीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ‘कानबाई माता की जय’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
शहरातील विविध भागांतून सजविलेल्या कानबाई मातेच्या मूर्ती डोक्यावर घेऊन विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदविला होता. घराघरांसमोर आकर्षक रांगोळ्या, फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. माहेरवाशिणी, नातेवाईक आणि आप्तेष्ट मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने उत्सवाला कौटुंबिक आणि सामाजिक रंग लाभला.
कानबाई उत्सवाला खानदेशाच्या लोकपरंपरेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रद्धा आणि परंपरेसोबतच नातेसंबंध दृढ करण्याचा आणि सामाजिक एकोप्याची भावना वाढविण्याचा हा उत्सव मानला जातो. माहेरवाशिणींच्या उपस्थितीमुळे या उत्सवाला विशेष भावनिक महत्त्व प्राप्त होते. तरुण पिढीनेही उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने खानदेशातील ही लोकपरंपरा पुढील पिढीकडे सोपविण्याचे चित्र यंदाही दिसून आले.
शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्येही कानबाई मातेच्या विसर्जन मिरवणुका भक्तिमय वातावरणात पार पडल्या. उत्सवाच्या सांगतेवेळी भाविकांनी कानबाई मातेला भावपूर्ण निरोप देत पुढील वर्षी पुन्हा येण्याची प्रार्थना केली. आनंद, श्रद्धा आणि डोळ्यांत विरहाची भावना अशा संमिश्र वातावरणात कानबाई मातेच्या उत्सवाची सांगता झाली.

Leave a Reply