संत सखाराम महाराजांचा यात्रोत्सव आनंदात साजरा करा : प.पू. प्रसाद महाराजांचे आवाहन

बेलापूरकर महाराजांच्या दिंडीचे आज आगमन; उद्या २७ एप्रिल रोजी रथोत्सव

 

अमळनेर (प्रतिनिधी) संत सखाराम महाराजांचा यात्रोत्सव हा अनेक वर्षांची परंपरा जपणारा धार्मिक सोहळा असून तो भाविकांनी शांततेत व आनंदात साजरा करावा, असे आवाहन वाडी संस्थानचे गादीपती प.पू. हभप प्रसाद महाराज यांनी पत्रकार परिषदेत केले.

यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात दुकाने व पाळणे थाटण्यास सुरुवात झाली असून पालिकेकडूनही सहकार्य मिळत आहे. यंदा दोन्ही बाजूंना पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून माजी सैनिकांच्या मदतीने ती सुरळीत ठेवली जाणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. यात्रा सुटसुटीत असल्याने भाविकांची गैरसोय होणार नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. निसर्गाची साथ आणि अखेरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत राहिल्यास यंदा यात्रा अधिक दिवस चालण्याची शक्यता आहे. पालिकेचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनीही भाविकांच्या वाहनांसाठी सुरक्षित पे पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली असून दुचाकींसाठी मोफत पार्किंगचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती दिली. बेलापूरकर महाराजांचे आगमन आज वारकरी संप्रदायातील गुरू-शिष्य परंपरेचा वारसा जपत बेलापूरकर महाराजांची दिंडी दरवर्षीप्रमाणे यंदाही अमळनेरमध्ये दाखल होत आहे. काल रात्री शहराच्या वेशीवर आगमन होऊन त्यांचा मुक्काम आर.के. पाटील फॅक्टरी येथे झाला. उद्योगपती विनोदभैय्या पाटील यांनी स्वागत केले. आज, २६ एप्रिल रोजी दशमीच्या दिवशी त्यांचे शहरात विधिवत आगमन होणार असून भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे. वाडी संस्थानचे गादीपती प्रसाद महाराज स्वतः शहराच्या वेशीवर जाऊन त्यांचे स्वागत करतात, ही परंपरा आजही जपली जाते.

यात्रोत्सव काळात बोरी नदीच्या वाळवंटातील संत सखाराम महाराजांच्या समाधीस्थळी दररोज सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत टाळ-मृदुंगाच्या गजरात कीर्तन-भजनाचा कार्यक्रम होतो, ज्यामुळे परिसर भक्तिमय होतो.

बेलापूर (ता. श्रीरामपूर, जि. नगर) येथील बेलापूरकर महाराज हे पांडुरंगाचे निष्ठावंत भक्त असून त्यांनी संत सखाराम महाराजांकडून अनुग्रह घेतला आहे. त्यांच्या दिंडीला यात्रोत्सवात विशेष मानाचे स्थान आहे. पालखी मिरवणुकीत पुढे दिंडी काढण्याचा मान, गुलालाचा पहिला मान आणि काल्याचे कीर्तन करण्याचा मानही त्यांच्या दिंडीला दिला जातो.

 

२७ एप्रिल रोजी रथोत्सव

 

मोहिनी एकादशी, २७ एप्रिल रोजी होणाऱ्या रथोत्सवामुळे अमळनेर शहर पुन्हा एकदा भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी यंदाही रथ ओढण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करण्यात येणार आहे. हा निर्णय मागील वर्षीपासून लागू करण्यात आला असून भाविकांनी त्याचे स्वागत केले आहे. रथोत्सवाची परंपरा मात्र कायम ठेवण्यात आली असून विविध समाजांना दिले जाणारे मान, मिरवणुकीचा मार्ग, वेळ आणि पानसुपारी यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. सायंकाळी ६ वाजता वाडी संस्थानात रथाचे पूजन होऊन सराफ बाजार, फरशी पूल, पैलाड मार्गे मिरवणूक निघेल व दुसऱ्या दिवशी पहाटे रथ पुन्हा वाडी संस्थानात दाखल होईल.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *