लायन्स क्लबतर्फे अमळनेर स्थानकावर १,२०० प्रवाशांना अन्नदान

अमळनेर (प्रतिनिधी)  सुरत–मुंबई रेल्वेमार्गावरील उधवाडा–उंबरगाव येथील पुलावर पाण्याची पातळी धोक्याच्या वर गेल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे गाडी क्रमांक २२९७२ पटणा–बांद्रा एक्सप्रेस मंगळवारी रात्री अमळनेर रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली. या आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे प्रशासनाने लायन्स क्लब, अमळनेरकडे मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद देत लायन्स क्लबने अवघ्या काही तासांत सुमारे १,२०० प्रवाशांना गरम खिचडी व पिण्याच्या पाण्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. या उपक्रमात रोटरी क्लब, अमळनेरनेही चहा, बिस्किटे, काकडी व भाकरीचे वाटप करून मोलाचे सहकार्य केले.

मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अमळनेर रेल्वे स्थानकावर अन्नदान उपक्रम राबविण्यात आला. रेल्वे उशिराने धावत असल्यामुळे अनेक प्रवाशांकडे जेवणाची कोणतीही व्यवस्था नव्हती. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन लायन्स क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांनी तातडीने खिचडी तयार करून तिचे शिस्तबद्ध पद्धतीने वितरण केले. अचानक आलेल्या आवाहनानंतर लायन्स क्लबच्या सदस्यांनी अल्पावधीत अन्नधान्य, स्वयंपाक आणि वितरणाची संपूर्ण व्यवस्था उभी केली. गरम अन्न व पिण्याचे पाणी मिळाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. अनेक प्रवाशांनी लायन्स क्लब, रोटरी क्लब आणि रेल्वे प्रशासनाचे मनापासून आभार मानले. दरम्यान, उधवाडा–उंबरगाव पुलावरील पाण्याची पातळी धोक्याच्या वर गेल्याने संबंधित मार्गावरील रेल्वे वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे गाडी क्रमांक २२९७२ पटणा–बांद्रा एक्सप्रेस अमळनेर स्थानकावर रात्रभर थांबविण्यात आली असून, पुढील नियोजनानुसार ती अमळनेरहून परत पटण्याकडे रवाना करण्यात येणार आहे. तसेच गाडी क्रमांक १९००४ भुसावळ–दादर खान्देश एक्सप्रेस नंदुरबार येथे थांबविण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. या आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे प्रशासनाच्या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद देत लायन्स क्लब आणि रोटरी क्लबने राबविलेल्या अन्नदान उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. यावेळी रेल्वेचे अधिकारी रवी पांडे आणि अशोक शिंदे यांनी दोन्ही सामाजिक संस्थांचे आभार मानून त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *