
कलाली येथे घरफोडी; दागिने व रोख रकमेसह ६१ हजारांचा ऐवज लंपास, गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कलाली येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवारी, ८ मे रोजी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली आशिक माहिती अशी की, तेजस गुलाब पाटील यांनी मारवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ८ मे रोजी रात्री घरातील सर्व सदस्य घराच्या गच्चीवर झोपले होते. पहाटे सुमारे ४ वाजेच्या सुमारास फिर्यादीची आई उठली असता घराचा कडीकोंडा तुटलेला असल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी आत जाऊन पाहणी केली असता घरातील कपाटच गायब असल्याचे लक्षात आले. यानंतर परिसरात शोध घेतला असता संबंधित कपाट हे फिर्यादीच्या काकांच्या घराजवळ बाहेर पडलेल्या अवस्थेत आढळून आले. कपाटाची पाहणी केली असता त्यातील सोन्याच्या दोन ग्रॅम वजनाच्या रिंगा, सहा भार वजनाचे चांदीचे जोड बेले, चार भार वजनाचे चांदीचे ब्रेसलेट, पाच भार वजनाच्या चांदीच्या लक्ष्मी मूर्ती तसेच ४० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ६१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे उघड झाले.
घटनेची माहिती मिळताच मारवड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत.

Leave a Reply