
फार्मासिस्ट दिनानिमित्त विविध स्पर्धांचा उत्साह; ८४ पोस्टर्समधून विद्यार्थ्यांचे प्रभावी सादरीकरण
अमळनेर (प्रतिनिधी) खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी. फार्मसी आणि स्व. प्रा. र. का. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर येथे जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. प्रश्नमंजूषा, रील्स निर्मिती, स्किटून्स, नाटक-पथनाट्य आणि पोस्टर सादरीकरण अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विशेष म्हणजे, तब्बल ८४ पोस्टर्स सादर करण्यात आली.
या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आरोग्य क्षेत्र व औषधनिर्माण शास्त्रातील फार्मासिस्टचे महत्त्व, औषधांचा सुरक्षित वापर आणि जनजागृती याबाबत प्रभावी संदेश दिला. पोस्टर सादरीकरण स्पर्धेच्या मूल्यमापनात प्रा. डॉ. शशिकांत जोशी, प्रा. हेमलता सूर्यवंशी व प्रा. वैशाली महाजन यांनी मोलाचे योगदान दिले. यावेळी फार्मसी महाविद्यालयाचे चेअरमन योगेश मुंदडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आरोग्य आणि औषधनिर्माण क्षेत्रात फार्मासिस्टचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून, समाजाच्या आरोग्याची जपणूक करण्यात त्यांची भूमिका कणासारखी असते, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता अशा स्पर्धांच्या माध्यमातून आपल्या कलागुणांचा विकास करावा आणि भविष्यात आदर्श व जबाबदार फार्मासिस्ट म्हणून देशाची सेवा करावी, असा संदेश त्यांनी दिला. प्राचार्य डॉ. धनंजय एम. पाटील यांनी मार्गदर्शन करताना आजच्या काळात औषधांचा सुरक्षित वापर, त्याविषयी जनजागृती आणि औषधनिर्माण शास्त्रातील नवनवीन बदल समजून घेणे फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी पोस्टर सादरीकरण, नाटक आणि रील्स निर्मितीसारख्या उपक्रमांत दाखविलेला उत्साह त्यांच्यातील उपजत सर्जनशीलता दर्शवतो. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे त्यांनी नमूद केले. समन्वयक प्रा. डॉ. एम. एस. वाघ यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. सतिष ब्राह्मणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह त्यांच्यात सामाजिक जाणीव रुजविण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन प्रेरणादायी ठरत असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी लांडगे आणि रिमझिम तोलानी यांनी केले.

Leave a Reply