आदिवासी संस्कृतीचे जतन ही काळाची गरज’ : प्रा. भाग्यश्री जाधव

अमळनेर (प्रतिनिधी)  आदिवासी समाजाची समृद्ध लोककला, भाषा, लोकसाहित्य, सांस्कृतिक परंपरा आणि जीवनपद्धती हा भारतीय सांस्कृतिक वैविध्याचा महत्त्वपूर्ण ठेवा असून, या संस्कृतीचे जतन व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. भाग्यश्री जाधव यांनी केले.

प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रा. भाग्यश्री जाधव यांनी ‘आदिवासी लोककला, भाषा आणि समृद्ध परंपरा’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आदिवासी समाजाच्या विविध लोककलांसह भाषा, लोकसाहित्य, सांस्कृतिक परंपरा आणि जीवनपद्धतीची माहिती देताना प्रा. भाग्यश्री जाधव यांनी आदिवासी समाजाचे निसर्गाशी असलेले अतूट नाते अधोरेखित केले. निसर्गाला केंद्रस्थानी ठेवून विकसित झालेली आदिवासी जीवनशैली ही पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देणारी असल्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासी संस्कृतीमध्ये पिढ्यान्‌पिढ्या जतन झालेल्या मौखिक परंपरा, लोकज्ञान आणि सांस्कृतिक वारसा यांचे दस्तऐवजीकरण होणे आवश्यक आहे. हा अमूल्य वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने योगदान देण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी डॉ. किरण गावित आणि डॉ. हेमंत पवार यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीपाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचा समन्वय प्रा. डॉ. पुष्पा पाटील यांनी केला, तर डॉ. किरण भागवत यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांनी व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आदिवासी संस्कृती, परंपरा आणि लोकजीवनाबाबत माहिती जाणून घेतली.

 

विविधतेचा आदर विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे आवश्यक’

 

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव यांनी आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक योगदानाचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, सांस्कृतिक संवेदनशीलता आणि समाजातील विविधतेचा आदर निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *