६५ मिनिटांची सभा; ५० मिनिटे गोंधळात, तरी १०० विषयांना दिली मंजुरी!

कर्मचारी बागुल यांच्या पदभारावरून सभागृहात खडाजंगी

अमळनेर  (प्रतिनिधी) अमळनेर नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा क्रमांक ४ नगराध्यक्ष डॉ. परीक्षित श्रीराम बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. ११) नगरपरिषद सभागृहात पार पडली. अवघ्या ६५ मिनिटांच्या या सभेत तब्बल १०० विषयांना मंजुरी देण्यात आली; मात्र त्यातील सुमारे ५० मिनिटे विजय बागुल यांच्या पदभारावरून झालेल्या गोंधळात आणि खडाजंगीत गेल्याने सभेच्या कामकाजाची चर्चा रंगली.

सभेच्या प्रारंभी विविध कारणांनी निधन झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वाढदिवस असलेल्या सदस्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. दिगंबर महाले यांचा अभिनंदन ठराव करण्यात आला. शहरातील विकासकामे, रस्ते व गटारींचे काँक्रिटीकरण, पाणीपुरवठा, पथदिवे, स्मशानभूमी, सुशोभीकरण, भुयारी गटार योजना, आपत्ती व्यवस्थापन तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित तब्बल १०० विषयांवर चर्चा होऊन सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. नगरपरिषद कर्मचारी विजय बागुल यांच्याकडील मिळकत विभागाचा पदभार काढून घेण्याच्या विषयावरून सभेत जोरदार खडाजंगी झाली. कोणत्या व्यापाऱ्यांनी तक्रारी केल्या, असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावर अनिल महाजन व पंकज चौधरी यांनी हा विषय सभेच्या कामकाजाचा नसल्याचे सांगत कामकाज पुढे सुरू ठेवण्याची सूचना केली. त्यावर डॉ. डीगंबर महाले यांनी “माझा आवाज दाबू नका, महागात पडेल,” असा इशारा दिल्याने काही काळ सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. काही विषय अध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनाही माहिती नसतात तसेच प्रशासनात आपसांत समन्वयाचा अभाव असल्याचेही महाले यांनी नमूद केले. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी स्पष्टीकरण देताना विजय बागुल यांच्याकडे आस्थापना व मिळकत विभागाचा पदभार होता. काही व्यापाऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांच्याकडून मिळकत वसुली विभागाचा पदभार काढून घेण्यात आला असून आस्थापना विभागाचा पदभार कायम असल्याचे सांगितले. सभेत डॉ. डीगंबर महाले, अनिल महाजन, पंकज चौधरी, प्रशांत निकम, श्रीराम चौधरी, योगिता कापडणीस, राजूभाऊ फाफोरेकर, कैलास पाटील, साहेबराव पाटील यांच्यासह नगरसेवकांनी विविध विषयांवर सहभाग घेतला. नगरसेवक, नगरसेविका तसेच पालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे कामकाज उपमुख्याधिकारी रवींद्रकुमार चव्हाण, नगर अभियंता सचिन गवांदे, लेखापरीक्षक कृणाल कोष्टी, लेखापाल सुदर्शनराज शामनानी, विद्युत अभियंता कुणाल महाले, सहायक कर निरीक्षक लौकिक समशेर, उपनगर अभियंता अजित लांडे, संगणक अभियंता संदीप पाटील, वैद्यकीय अधिकारी विलास महाजन, अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी व सभा लिपिक प्रमोद लटपटे यांनी पाहिले. अखेरीस अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

 

पूरग्रस्तांसाठी स्वतंत्र आपत्कालीन निधीची मागणी

 

अमळनेर शहराला नुकत्याच आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी स्वतंत्र आपत्कालीन निधी निर्माण करण्याची मागणी सभेत करण्यात आली. पुरामुळे अनेक नागरिकांच्या घरांचे व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी घरपट्टी माफ करण्याची मागणीही करण्यात आली. शहरातून वाहणारे नैसर्गिक नाले व ओढ्यांचे संरक्षण, त्यावरील अतिक्रमणे हटविणे आणि भविष्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबतही चर्चा झाली. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी प्रशासनाकडून याबाबत आवश्यक नियोजन व कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगितले. महापुराचे पाणी शहरातील अनेक भागांत शिरल्याच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका योगिता कापडणीस यांनी या विषयावर सविस्तर चर्चा करण्याची मागणी केली. पिंपळे रोड तसेच ढेकू रोडवरील डीपी रस्त्यांवरूनही पाणी शहरात आले. त्यामुळे या मार्गांवरील पाण्याचा निचरा व पूरप्रतिबंधक उपाययोजनांचे नियोजन करण्याची मागणी करण्यात आली.

 

डीपी रस्त्यांच्या कामावर सदस्यांची नाराजी

 

शहर विकास आराखड्यातील डीपी रस्त्यांच्या कामाबाबतही सभेत नाराजी व्यक्त करण्यात आली. संबंधित ठेकेदाराकडून काम पूर्ण करण्यास विलंब होत असून कामात अनेक त्रुटी असल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना गटारींची व्यवस्था करावी, कामातील त्रुटी दूर करून काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली. कामाला मुदतवाढ देऊन ठेकेदाराला एक प्रकारे अभय देण्यात आले असल्याचे दिसत असल्याची नाराजीही व्यक्त करण्यात आली. ठेकेदाराच्या कामातील हलगर्जीपणामुळे पोलीस हवालदाराचा मृत्यू झाल्याचा मुद्दाही सभेत उपस्थित करण्यात आला. त्यामुळे रस्त्याचे काम दर्जेदार व सुरक्षित पद्धतीने तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.

 

पालिका शाळांना ‘सीबीएसई पॅटर्न’च्या सुविधा

 

नगरपरिषद शिक्षण कराच्या माध्यमातून १ कोटी रुपये वसूल करते, मग ते जातात कुठे, असा सवाल सभेत उपस्थित करण्यात आला. नगरपरिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष लक्ष देण्याचा मुद्दा शिक्षण सभापती नाविद शेख यांनी मांडला. पालिका शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणासोबत पुरेशा सुविधा, बाके, पिण्याचे पाणी आदींची आवश्यकता असून सुविधांच्या अभावामुळे अनेक पालक खासगी शाळांकडे वळत असल्याचे त्यांनी सांगितले.

पालिका शाळांमध्ये ‘सीबीएसई पॅटर्न’ किंवा त्याच धर्तीवरील आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होईल. शहराच्या मध्यवर्ती भागात या शाळा असल्याने विद्यार्थ्यांना वाहनाचा अतिरिक्त खर्चही करावा लागणार नाही. त्यामुळे पालिका शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा ठराव नाविद शेख यांनी मांडला. त्यास सर्व सदस्यांनी एकमुखाने मंजुरी दिली.

 

संत शिरोमणी रोहिदास महाराज स्मारकाला मंजुरी

 

संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या स्मारकासाठी सहा महिन्यांपासून मागणी करूनही लक्ष दिले जात नसल्याचा आरोप सभेत करण्यात आला. यावर नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी हा विषय आपल्याला आदल्या दिवशीच माहिती झाल्याचे सांगितले. चर्चेनंतर संत रोहिदास महाराज स्मारक उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

बोरी नदीपात्रात विठ्ठल माऊली स्मारकासह सुशोभीकरण, बसस्थानक परिसरात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले स्मारक तसेच सुभाष चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याबाबतही सभेत चर्चा झाली.

 

महिलांसाठी ‘लाडकी बहीण हॉस्पिटल’चा मानस

 

महिलांसाठी ‘लाडकी बहीण हॉस्पिटल’ सुरू करण्याचा मानस असल्याचे नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी सभेत सांगितले. जन्म-मृत्यू दाखला तसेच कलर प्रिंटसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कावरही चर्चा झाली. यासाठी पूर्वीप्रमाणे ५० रुपये शुल्क कायम ठेवण्यास सभेने मंजुरी दिली.

 

पाणीपुरवठा, पथदिवे आणि भुयारी गटार योजनेला मंजुरी

 

पाणीपुरवठा विभागातील विविध कामे, जलकुंभ उभारणीसाठी पीएमसी नियुक्ती, उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना, मागणीनुसार वैयक्तिक नळजोडण्या तसेच शहरातील भुयारी गटार योजना पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. शहरातील पथदिव्यांसाठी सौरऊर्जेवर आधारित सुविधा, आवश्यक ठिकाणी नवीन पथदिवे आणि देखभालीसाठी मोटराइज्ड शिडी वाहन घेण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. विविध प्रभागांतील रस्ते व गटारींचे काँक्रिटीकरण, नवीन पाण्याची टाकी, खुल्या भूखंडांचा विकास, पेव्हर ब्लॉक, चौकांचे सुशोभीकरण आदी कामांनाही मंजुरी देण्यात आली.

सुरुवात खडाजंगीने, समारोप गळ्यात हात टाकून

सभेच्या सुरुवातीला विजय बागुल यांच्या पदभारावरून झालेल्या चर्चेमुळे वातावरण तापले होते. मात्र, अखेरीस सदस्यांनी एकमेकांच्या गळ्यात हात टाकून वातावरण हलके केले. त्यामुळे ‘सभेची सुरुवात खडाजंगीने, तर समारोप गळ्यात हात टाकून’ झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली. विशेष म्हणजे, अवघ्या ६५ मिनिटांच्या सभेत ५० मिनिटे गोंधळ आणि खडाजंगलीत गेल्यानंतरही उर्वरित वेळेत तब्बल १०० विषयांना मंजुरी देण्यात आली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *