
आधुनिक तंत्रज्ञान, कीड-रोग व्यवस्थापन व उत्पादनवाढीसाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
अमळनेर (प्रतिनिधी) तालुका कृषी कार्यालय, अमळनेर यांच्या वतीने मौजे हिंगोणे बु. येथे कपास क्रांती योजनेअंतर्गत कापूस पिक प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देणे, उत्पादनवाढीसोबत उत्पादन खर्च कमी करणे आणि दर्जेदार कापूस उत्पादनासाठी आवश्यक तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन करणे, हा प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश होता.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांनी कपास क्रांती योजनेची उद्दिष्टे, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शास्त्रशुद्ध कापूस लागवड, संतुलित खत व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर तसेच एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सुधारित तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने अवलंब केल्यास कापूस उत्पादनासोबत गुणवत्तेतही लक्षणीय वाढ होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
उपकृषी अधिकारी योगेश वंजारी यांनी गुलाबी बोंडअळीसह विविध किडींचे वेळेवर निरीक्षण, फेरोमोन सापळ्यांचा वापर आणि शिफारशीनुसार कीडनियंत्रण करण्याच्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच कपास क्रांती योजनेसह कृषी विभागाच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास सरपंच केदारसिंग जाधव, जितेंद्र पाटील, भरत पाटील, प्रवीण पाटील, हरेश जाधव, भरतसिंग पाटील, पोलीस पाटील चेतन पाटील, शिवाजी पाटील, रामकृष्ण पाटील यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांशी संवाद साधत कापूस पिकासंदर्भातील विविध प्रश्न उपस्थित केले. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करून आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी दीपक चौधरी यांनी केले. प्रशिक्षणानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी कपास क्रांती योजनेअंतर्गत अशा प्रकारचे मार्गदर्शनपर कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Leave a Reply