
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अमळनेरात सीडबॉल कार्यशाळा व वृक्षारोपण
स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा ७.० अंतर्गत विविध उपक्रम; नागरिकांना हरित व स्वच्छतेची शपथ

अमळनेर (प्रतिनिधी) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत अमळनेर नगरपरिषद आणि महिला हाऊसिंग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियान २०२६ व माझी वसुंधरा अभियान ७.० अंतर्गत विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. इंदिरा गांधी भवन येथे आयोजित सीडबॉल बनवण्याच्या कार्यशाळेत सुमारे एक हजार सीडबॉल तयार करण्यात आले, तर ओंकार नगर येथे वृक्षारोपण करून हरित शपथ घेण्यात आली.
शहरातील इंदिरा गांधी भवन येथे झालेल्या कार्यशाळेत पर्यावरण संवर्धनासाठी सीडबॉल तयार करण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिक, महिला व स्वयंसेवक सहभागी झाले. कार्यशाळेदरम्यान जवळपास १,००० सीडबॉल तयार करण्यात आले. हे सीडबॉल आगामी काळात विविध ठिकाणी पेरून हरित क्षेत्र वाढविण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. त्यानंतर ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ओंकार नगर येथे ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत अमळनेर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संरक्षण व वृक्षसंवर्धनाची हरित शपथ घेतली.
या कार्यक्रमात घनकचरा अधिनियम २०२६ अंतर्गत जारी करण्यात आलेल्या नियमांविषयी नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच उपस्थित नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, महिला हाऊसिंग ट्रस्टच्या पदाधिकारी आणि नागरिकांना घनकचरा व्यवस्थापन नियमावलीची माहितीपत्रके वितरित करण्यात आली. दरम्यान, नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत शहरातील प्रभाग क्रमांक १ ते १८ मधील मुकादमांसाठी स्वच्छता विभाग कार्यालयात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०२६ मधील विविध नियम, जबाबदाऱ्या आणि अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सर्व मुकादमांना हरित शपथ देऊन घनकचरा व्यवस्थापन अधिनियमाची प्रत वितरित करण्यात आली. या उपक्रमांना नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, विविध प्रभागांतील नगरसेवक, आरोग्य सभापती, नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागातील स्वच्छता निरीक्षक, शहर समन्वयक, कर्मचारी, महिला हाऊसिंग ट्रस्टच्या पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी पर्यावरण संरक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत नागरिकांनी अशा अभियानांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. अमळनेर शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि हरित बनविण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply