
झामी चौक परिसरात १० दिवस पाणीपुरवठा ठप्प; नागरिकांच्या पुढाकाराने सुटला प्रश्न
मुख्य व्हॉल माती-वाळूने बुजला; प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात माजी नगरसेवक विक्रांत पाटील संतप्त

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातील झामी चौक परिसरात नगर परिषदेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील हलगर्जीपणाचा फटका नागरिकांना बसला असून तब्बल दहा दिवस परिसरातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिल्याची घटना समोर आली आहे. मुख्य व्हॉल माती व वाळूने बुजल्याने पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला होता. मात्र प्रशासनाकडून वेळेत दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहितीनुसार, झामी चौक येथील नव्याने बांधण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळील मुख्य व्हॉल ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून वाळू व माती टाकून झाकला गेला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरातील पाणीपुरवठा बंद झाला. समस्या गंभीर असतानाही संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर स्थानिक नागरिकांनी स्वतः पुढाकार घेतला. शेतकी संघाचे संचालक विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जितेंद्र ठाकूर, प्रकाश महाजन, कैलास महाजन, अशोक पाटील, हितेश बडगुजर, अशोक नेवे, शुभम शिंपी, परेश उदेवाल आणि राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी जाऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आवश्यक काम करून घेतले. यावेळी नगर परिषद कर्मचारी विजय विसावे यांनीही तात्काळ हस्तक्षेप करून मुख्य व्हॉल मोकळा करून घेतला. नागरिकांच्या या प्रयत्नांमुळेच तब्बल अकरा ते बारा दिवसांनंतर परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला. अन्यथा नागरिकांना आणखी काही दिवस पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागले असते. दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष झाल्याने नगर परिषद प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा शहरात सुरू आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पाणीपुरवठा यंत्रणेची नियमित तपासणी, कामांवर प्रभावी देखरेख आणि तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply