
अमळनेरच्या भैय्यासाहेब मगर यांची महाराष्ट्र राज्य पी.टी.ए. क्लासेस संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील साई इंग्लिश अकॅडमी कोचिंग क्लासेसचे संचालक भैय्यासाहेब मगर यांची प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (पी.टी.ए.) महाराष्ट्र राज्य या प्रतिष्ठित संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे दीर्घकालीन योगदान, नेतृत्वगुण आणि संघटन कौशल्याची दखल घेत ही निवड करण्यात आल्याने अमळनेरसह उत्तर महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (पी.टी.ए.) महाराष्ट्र राज्य ही राज्यातील कोचिंग क्लासेस संचालकांची सर्वांत जुनी, प्रतिष्ठित आणि शिखर संघटना म्हणून ओळखली जाते. सन २००० मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेचे राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये कार्य असून हजारो कोचिंग क्लासेस संचालक या संघटनेचे सभासद आहेत. शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न, कोचिंग क्लासेसचे हित, शैक्षणिक गुणवत्ता आणि संघटनात्मक बळकटीसाठी ही संघटना सातत्याने कार्यरत आहे.
संघटनेच्या नव्या कार्यकारिणीत सातारा येथील डॉ. पी. कुलकर्णी यांची अध्यक्षपदी, तर वाई येथील डॉ. नितीन कदम यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासमवेत भैय्यासाहेब मगर यांची कार्याध्यक्षपदी झालेली निवड ही उत्तर महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
भैय्यासाहेब मगर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि कोचिंग क्लासेस क्षेत्राच्या प्रगतीसाठी सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, शैक्षणिक गुणवत्ता आणि शिक्षकांमधील समन्वय यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची राज्यस्तरावर दखल घेत त्यांच्या खांद्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा लाभ राज्यभरातील कोचिंग क्लासेस संचालकांना मिळेल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला आहे. भैय्यासाहेब मगर यांच्या या मानाच्या निवडीबद्दल शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, विविध सामाजिक संस्था, शिक्षक, कोचिंग क्लासेस संचालक, विद्यार्थी, पालक तसेच अमळनेरकरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply