
हिंगोणे खु.प्र.ज. ग्रामपंचायत १०० टक्के थकबाकीमुक्त; सरपंच राजश्री पाटील यांचा हृदयस्पर्शी उपक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील हिंगोणे खु.प्र.ज. ग्रामपंचायतीने लोकनियुक्त सरपंच राजश्री राजेश पाटील यांच्या संकल्पनेतून ऐतिहासिक पाऊल उचलत ग्रामपंचायत १०० टक्के थकबाकीमुक्त केली आहे. गावाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेल्या पाटील यांनी स्वखर्चातून संपूर्ण गावाची घरपट्टी व पाणीपट्टी भरत एक आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे, या कराच्या रकमेतील निधीतून ग्रामपंचायतीचे थकीत वीज बिल देखील अदा करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, सरपंच राजश्री पाटील यांनी पदाची धुरा सांभाळल्यानंतर गावात अनेक स्तुत्य विकासकामे राबविली. यामध्ये गाव दरवाजा उभारणी, नवीन स्मशानभूमी बांधकाम, ग्रामपंचायत कार्यालयाची उभारणी, पाणीपुरवठा योजना, संपूर्ण गावातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण, आधुनिक व डिजिटल अंगणवाडी, शनिदेव मंदिर बांधकाम तसेच महादेव मंदिराचा जीर्णोद्धार अशा कामांचा समावेश आहे. या सर्व विकासकामांमुळे गावाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने वेगाने सुरू झाली आहे. विकासकामांसोबतच सामाजिक बांधिलकी जपत श्रीमती पाटील यांनी स्वतःच्या खर्चातून सुमारे ९ लाख रुपयांची घरपट्टी व पाणीपट्टी भरली. त्यामुळे ग्रामपंचायतीला कररूपाने निधी उपलब्ध झाला आणि ग्रामस्थांना कोणतीही आर्थिक झळ बसली नाही. या कररकमेचा योग्य वापर करत ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीने थकीत लाईट बिलाच्या ७ लाख ८० हजार रुपयांच्या रकमेचा धनादेश महावितरणच्या अमळगाव कक्षाचे सहाय्यक अभियंता उज्वल पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला. धनादेश सुपूर्द करताना आमदार पाटील स्वतः उपस्थित होते. त्यांनी ग्रामपंचायतीच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत हे पाऊल इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामसेवक पवनकुमार वाघ, वायरमन प्रमोद सैंदाने आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत थकबाकीमुक्त झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, सरपंच राजश्री पाटील यांच्या कार्याचा सर्वत्र गौरव होत आहे. त्यांच्या या हृदयस्पर्शी निर्णयामुळे हिंगोणे खु.प्र.ज. गाव विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचले आहे.

Leave a Reply