
कमी गुणांमुळे गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात; प्रवेशासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी
दहावीत पन्नास ते पासष्ट टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळत नसल्याबद्दल किरण पाटील यांचे निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी) दहावीच्या परीक्षेत पन्नास ते पासष्ट टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळत नसल्याने त्यांच्यावर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. या विद्यार्थ्यांसाठी तातडीने शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी किरण भिला पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि शिक्षण विभागाकडे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये जळगाव जिल्ह्यातील दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत अडचणींचा सामना करावा लागत आहे. अमळनेर शहरासह तालुक्यातील बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावी प्रवेशासाठी पहिल्या गुणवत्ता यादीत 80 ते 85 टक्के गुणांची मर्यादा ठेवली आहे. त्यामुळे 50, 55, 60 आणि 65 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या हजारो विद्यार्थ्यांना कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागातील, शेतमजूर कुटुंबातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींमुळे जास्त गुण मिळवता आले नसले तरी त्यांची पुढे शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा आहे. मात्र वाढलेल्या गुणवत्ता निकषांमुळे ही मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर जात असून काही विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील सर्व अनुदानित व विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना 35 टक्के गुणांपासून प्रवेश देण्याबाबत तातडीने निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक महाविद्यालयात कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी किमान 25 टक्के जागा राखीव ठेवून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्रनिकेतन, एमसीव्हीसी आणि इतर कौशल्याधारित अभ्यासक्रमांमधील जागा वाढवून विद्यार्थ्यांना पर्यायी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. या अभ्यासक्रमांबाबत तालुकास्तरावर समुपदेशन शिबिरे आयोजित करून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची मागणीही करण्यात आली आहे. प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र यादी शिक्षण विभागामार्फत तयार करून त्यांना उपलब्ध रिक्त जागांवर प्राधान्याने प्रवेश मिळवून द्यावा, अशीही सूचना करण्यात आली आहे. किरण पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “सर्व शिक्षा अभियान” आणि “नवीन शैक्षणिक धोरण २०२०” नुसार शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत हक्क आहे. केवळ कमी गुण मिळाले म्हणून गरीब घरातील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाऊ नये. प्रशासनाने या प्रश्नात जातीने लक्ष घालून प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी आणि जळगाव जिल्ह्यात एकही विद्यार्थी प्रवेशाविना राहणार नाही याची दक्षता घ्यावी. या मागणीमुळे कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शिक्षण विभाग यावर कोणती भूमिका घेतो, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply