
अतिवृष्टीग्रस्तांसाठी जयनिल फाऊंडेशनचा मदतीचा हात; अन्न-पाण्यासह जेसीबी मशिनरीचीही मदत
अमळनेर (प्रतिनिधी) अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी जयनिल फाऊंडेशन, अमळनेरने सामाजिक बांधिलकी जपत तातडीने मदतकार्य हाती घेतले. फाऊंडेशनच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांसाठी अन्नपदार्थ तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्यात आली.
या मदतकार्याचा पुढाकार जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम पाटील व उपाध्यक्ष वरून पाटील यांनी घेतला. नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदत योग्य लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावी, यासाठी रोटरी क्लब अमळनेर, लायन्स क्लब अमळनेर, जैन सोशल ग्रुप तसेच अमळनेर तालुका व शहर पत्रकार संघाने मोलाचे सहकार्य केले. या संस्थांच्या स्वयंसेवकांनी दिवसभर मदत वितरणाच्या कामात सक्रिय सहभाग घेत पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत अन्न व शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचविले. अतिवृष्टीमुळे अनेक भागांत नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असताना सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे केलेल्या या मदतकार्यामुळे संकटग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला.
दरम्यान, गौतम पाटील यांच्या नेतृत्वाखाली जयनिल फाऊंडेशनच्या टीमने दिवसभर पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष भेटी देत नागरिकांना धीर दिला. केवळ अन्न व पिण्याच्या पाण्याचे वितरण करून न थांबता, ज्या ठिकाणी मदतकार्य आणि अडथळे दूर करण्यासाठी यंत्रसामग्रीची गरज होती,
त्या ठिकाणी जेसीबीसह इतर मशिनरीही उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे पूरस्थितीत अडकलेल्या नागरिकांना मदत मिळण्यास तसेच आवश्यक ठिकाणी बचाव व साफसफाईच्या कामांना गती मिळाली. नैसर्गिक आपत्तीच्या काळात विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवक आणि नागरिकांनी एकत्र येत गरजूंच्या मदतीसाठी पुढे येणे, हे सामाजिक एकोप्याचे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
जयनिल फाऊंडेशनसह रोटरी क्लब, लायन्स क्लब, जैन सोशल ग्रुप आणि अमळनेर तालुका व शहर पत्रकार संघाने केलेल्या या मदतकार्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. संकटाच्या काळात सामाजिक संस्थांनी दाखविलेली तत्परता आणि माणुसकीची भावना पूरग्रस्तांसाठी आधार ठरत आहे. 

Leave a Reply