महिलांना स्वावलंबी करण्यासाठी डी एल सोसिअल फौंडेशन चा पुढाकार

महिला स्वावलंबन अभियान– २०२६’ ची सुरुवात; कौशल्य प्रशिक्षणासह व्यवसायासाठी साधनसामग्री उपलब्ध

अमळनेर (प्रतिनिधी) : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने DL Social Foundationच्या वतीने ‘महिला स्वावलंबन अभियान–२०२६’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. ‘कौशल्यातून स्वावलंबनाकडे’ या संकल्पनेवर आधारित या अभियानातून महिलांना स्वयंरोजगारासाठी आवश्यक साधनसामग्री, कौशल्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत महिलांसाठी शिलाई मशीन किट, ब्युटी किट, खाद्यपदार्थ व्यवसाय किट आणि डिजिटल सेवा किट असे चार व्यवसायाधारित पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. निवड झालेल्या लाभार्थींना त्यांच्या आवडी, कौशल्य आणि व्यवसायाच्या गरजेनुसार यापैकी एका व्यवसायासाठी किट देण्यात येईल.

 

१८ सप्टेंबरपासून अर्ज वितरण

 

या अभियानासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार असून १८ सप्टेंबर २०२६ पासून अर्ज वितरण सुरू होणार आहे. प्राप्त अर्जांची छाननी संस्थेने निश्चित केलेल्या पात्रता व गुणांकन निकषांनुसार केली जाणार आहे.

लाभार्थी निवडताना आर्थिक गरज, संबंधित कौशल्य अथवा अनुभव, व्यवसाय सुरू करण्याची तयारी, कौटुंबिक परिस्थिती तसेच प्रशिक्षण व मार्गदर्शन घेण्याची तयारी या बाबींचा विचार केला जाणार आहे.

 

केवळ मदत नव्हे, तर स्वावलंबनाची संधी

 

महिलांना केवळ आर्थिक मदत देण्यापेक्षा त्यांच्या हातात कौशल्य आणि व्यवसायासाठी आवश्यक साधनसामग्री देऊन दीर्घकालीन स्वयंरोजगाराची संधी निर्माण करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या अथवा स्थानिक पातळीवर व्यवसाय सुरू करून आपल्या कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात हातभार लावण्याची संधी मिळणार आहे.

महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन DL Social Foundationच्या वतीने करण्यात आले आहे.

संपर्क : DL Social Foundation, समर्थ नगर, धुळे रोड, अमळनेर.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *