
निसर्डीतील ब्लास्टिंगवरून खळबळ; नाहरकत नसतानाही उत्खननाला हरकत नसल्याच्या अहवालाने खळबळ
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील निसर्डी येथील गट क्रमांक २९ मधून बेकायदेशीररीत्या ब्लास्टिंग करून दगड व मुरूम उत्खनन केले जात असल्याची तक्रार नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे. तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांनी १६ रोजी मंडळाधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिल्यानंतर मंडळाधिकाऱ्यांनी १७ रोजी अहवाल सादर केला. मात्र गट क्रमांक २९/१ब मध्ये संबंधितांनी नाहरकत प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले नसतानाही ब्लास्टिंगचा धोका नसून परवानगी देण्यास हरकत नसल्याचा अहवाल सादर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राहुल विश्वास पाटील, विनोद मधुकर सैंदाणे, प्रकाश कन्हैय्यालाल पाटील, किर्तीलाल भिला पाटील, अनिल गंभीर पाटील, शिवाजी पाटील, अतुल कैलास पाटील, नितीन अनिल पाटील, गोवर्धन भगवान पाटील यांच्यासह ५० नागरिकांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी तसेच स्फोटक ब्लास्टिंग परवानगी प्राधिकरण यांच्याकडे ८ सप्टेंबर रोजी तक्रार केली होती. तक्रारीसोबत त्यांनी ब्लास्टिंग व उत्खननाचे अक्षांश-रेखांश तसेच छायाचित्रेही सादर केली. तसेच निसर्डी ग्रामपंचायतीने नाहरकत दिलेली नसल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यालगत सुमारे २० फूट खोल व ५ इंच रुंद खड्ड्यात दारुगोळा भरून विस्फोट केला जातो. त्यामुळे निसर्डी आणि वाघोदा या दोन्ही गावांतील घरे हादरतात. या खदानीला लागून असलेल्या शेतात मजूर काम करतात, सुमारे ३० विद्यार्थी लोंढवे शाळेत पायी जातात, तर परिवहन मंडळाची बस चार वेळा ये-जा करते. त्यामुळे विद्यार्थी, मजूर आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. परवानगी दिलेली नसतानाही उत्खनन व ब्लास्टिंग सुरू असल्याने सर्व कागदपत्रांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
१६ रोजी तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांनी मंडळाधिकाऱ्यांना या गटाची मालकी, या जागेवर कोणते उत्खनन झाले आहे, सध्या उत्खनन सुरू आहे का, किती ब्रास उत्खनन झाले आहे याची मोजणी करावी, तसेच शेजारील शेतरस्ते, पाझर तलाव, शासकीय मालमत्ता किंवा शेतीपिकांचे नुकसान झाले आहे का, याची पाहणी करून सर्व कागदपत्रांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र मंडळाधिकाऱ्यांनी १७ रोजी सादर केलेल्या अहवालात वेगळीच माहिती नमूद केली आहे. स्फोटक करण्याचे ठिकाण गावाच्या हद्दीपासून १ हजार मीटर अंतरावर असल्याचे नमूद करून लोकवस्तीला धोका नसल्याचा अहवाल देण्यात आला आहे. तसेच मालकाने नाहरकत प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले नसतानाही डबर काढण्यास आणि ब्लास्टिंग करण्यास परवानगी देण्यास हरकत नसल्याचे मंडळाधिकाऱ्यांनी अहवालात म्हटले आहे.
अहवाल प्राप्त झाल्यावर योग्य ती कार्यवाही करू
“यासंदर्भात मंडळाधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना चौकशीसाठी पाठवले होते. त्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. तो आल्यावर योग्य ती कार्यवाही करता येईल.” डॉ. उमा ढेकळे, तहसीलदार, अमळनेर

Leave a Reply