
सहा वर्षांनंतरही आरुषी भिलच्या वारसांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा!
उषाबाई भिल यांच्या वारसांना एक लाखांची मदत मंजूर; आरुषीच्या कुटुंबाला अद्याप प्रतीक्षाच
सरपंच महेंद्र बोरसे यांच्यासह ग्रामस्थांची शासनाकडे तातडीने मदतीची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी )निम्न तापी प्रकल्प पाडळसेच्या पूर्णतः बुडीत क्षेत्रात येणाऱ्या सात्री, ता. अमळनेर या गावाचा पावसाळ्यात पूरपरिस्थितीमुळे तालुक्याशी संपर्क तुटतो. यामुळे गावकऱ्यांना शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगारासह दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषतः पूरपरिस्थितीत वैद्यकीय सेवा उपलब्ध न झाल्याने उपचाराअभावी दोन जणांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली होती. मात्र, या घटनेनंतरही मृत आरुषी भिल हिच्या वारसांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उपचाराअभावी दोन जणांचा मृत्यू
सात्री गावातील पूरपरिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करणाऱ्या दोन दुर्दैवी घटना घडल्या. ७ सप्टेंबर २०२१ रोजी ११ वर्षीय आरुषी सुरेश भिल, तर ५ ऑक्टोबर २०२२ रोजी ५३ वर्षीय उषाबाई रामलाल भिल यांचा पूरपरिस्थितीत वैद्यकीय सेवा उपलब्ध न झाल्याने उपचाराअभावी मृत्यू झाला. या घटनांनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सरपंच महेंद्र बोरसे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले होते.
पुनर्वसन, पर्यायी रस्ता आणि आर्थिक मदतीची मागणी
आंदोलनादरम्यान गावाचे तातडीने पुनर्वसन करावे, पुनर्वसन होईपर्यंत गावासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा तसेच मृतांच्या वारसांना आर्थिक मदत द्यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकही घेण्यात आली होती. या बैठकीत मृतांच्या वारसांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याबाबत आश्वासन देण्यात आले होते.
मात्र, सातत्याने पाठपुरावा करूनही मागण्यांची पूर्तता होत नसल्याने सरपंच महेंद्र बोरसे यांनी १० ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन १५ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
१३ ऑगस्टच्या बैठकीनंतर आंदोलन स्थगित
आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी १३ ऑगस्ट २०२६ रोजी अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक आयोजित केली. या बैठकीत सात्री गावाच्या समस्यांबाबत प्रशासन गांभीर्याने लक्ष घालून तातडीने उपाययोजना करेल, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले होते.
दरम्यान, मृतांच्या वारसांना आर्थिक मदत मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शासन स्तरावर पुन्हा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानुसार उषाबाई रामलाल भिल यांच्या वारसांना विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.
उषाबाईंच्या वारसांना मदत, मग आरुषीच्या कुटुंबाला प्रतीक्षा का?
उषाबाई भिल यांच्या वारसांना आर्थिक मदत मंजूर झाली असली, तरी ७ सप्टेंबर २०२१ रोजी मृत्यू झालेल्या चिमुरड्या आरुषी सुरेश भिल हिच्या वारसांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही. त्यामुळे आरुषीच्या कुटुंबीयांना न्याय कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आरुषीच्या वारसांनाही तातडीने आर्थिक मदत मंजूर करून ती प्रत्यक्ष वितरित करावी, अशी मागणी सरपंच महेंद्र बोरसे यांच्यासह सात्री येथील ग्रामस्थांनी केली आहे. केवळ आश्वासनांवर न थांबता प्रशासनाने या प्रकरणात तातडीने निर्णय घेऊन पीडित कुटुंबाला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply