लायन्स क्लबकडून ३७ तीव्र कुपोषित बालकांना पोषण आहार

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यात जून २०२६ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ३७ बालके तीव्र कुपोषित तर २१४ बालके मध्यम कुपोषित असल्याचे समोर आल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत लायन्स क्लब, अमळनेरने सामाजिक बांधिलकी जपत ३७ तीव्र कुपोषित बालकांना पोषण आहाराचे वाटप केले. जी. एस. हायस्कूल येथील लायन्स हॉलमध्ये शुक्रवारी (दि. १७) सकाळी ११ वाजता हा उपक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी प्रत्येक बालकाला २०० ग्रॅम प्रथिनयुक्त पूड आणि राजगिरा लाडू देण्यात आले. तसेच दूरवरच्या ग्रामीण भागातून आलेल्या सर्व मातांना सुनील चौधरी यांच्या वतीने बसभाडे देऊन मदतीचा हात पुढे करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा परिषद जळगावचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंतराव भदाणे, पंचायत समिती अमळनेरचे गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रेमलता पाटील, लायन्स क्लबचे अध्यक्ष जितेंद्र पारख, ज्येष्ठ लायन डॉ. डिगंबर महाले, प्रकल्प अध्यक्ष डॉ. संदीप जोशी व महेंद्र पाटील, तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि लायन्स क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. हेमंतराव भदाणे यांनी कुपोषणाची समस्या केवळ उपचारांपुरती मर्यादित न ठेवता तिच्या मूळ कारणांवर काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत माता आणि बालकांच्या पोषणाकडे विशेष लक्ष देणे, बालकांची पचनशक्ती वाढेल असा सकस आहार देणे तसेच कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी लायन्स क्लब, अमळनेरचे विशेष आभार मानत सेवाभावी संस्थांनी अशा सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन समाजसेवेचे व्रत कायम ठेवावे, असे आवाहन केले. ज्येष्ठ लायन डॉ. डिगंबर महाले यांनी, “लायन्स क्लब हा समाजातील वंचित आणि गरजू घटकांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असतो. समाजसेवा हीच लायन्स क्लबची परंपरा आहे,” असे सांगितले. तर अध्यक्ष जितेंद्र पारख यांनी भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांसाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल आणि गरजूंसाठी लायन्स क्लब नेहमीच तत्पर राहील, अशी ग्वाही दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिलिंद नवसारीकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रेमलता पाटील यांनी केले. या प्रसंगी सुनील चौधरी, दिनेश मणियार, चंद्रकांत महाजन, विजय पारख, प्रितेश पारख, जितेंद्र जैन, महावीर पहाडे, प्रदीप जैन, प्रकाश जैन, राज जैन आणि रोनक दोधिवाला यांच्यासह लायन्स क्लबचे अनेक सदस्य उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *